मैत्रेयचे गुंतवणूकदार कचेरीवर धडकले
By admin | Published: March 17, 2016 03:06 AM2016-03-17T03:06:51+5:302016-03-17T03:06:51+5:30
खोटे आश्वासन देवून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉटर्स स्ट्रक्चर्स प्रा.लि. व मैत्रेय सर्वीसेस प्रा.लि.
यवतमाळ : खोटे आश्वासन देवून फसवणूक करणाऱ्या मैत्रेय प्लॉटर्स स्ट्रक्चर्स प्रा.लि. व मैत्रेय सर्वीसेस प्रा.लि. या कंपनीवर कारवाईच्या मागणीसाठी एजंट व गुंतवणूकदारांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. नगरसेवक दत्ता कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थापन करण्यात आलेल्या मैत्रेय अन्याय निवारण संघर्ष समितीच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
गुंतवणुकीच्या नावाखाली या कंपनीने जिल्ह्यातील हजारो नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले. मॅच्युरिटीच्या तारखेला रकमेऐवजी धनादेश देण्यात आले. हे संपूर्ण धनादेश वटविले गेले नाहीत. यात नागरिकांची फसवणूक झाली. नागरिकांना रक्कम परत मिळावी आणि कंपनीच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, या मागणीसाठी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. या समितीने केलेल्या आवाहनानुसार पहिल्या पाच दिवसात १२५१ गुंतवणूकदारांनी अर्ज केले. प्राप्त झालेले सर्व अर्ज आणि निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सोमवारी सादर करण्यात आले.
मैत्रेय अन्याय निवारण संघर्ष समितीचे मुख्य संयोजक नगरसेवक दत्ता कुळकर्णी, नगरसेवक अमोल देशमुख, कमल मिश्रा, प्रशांत दर्यापूरकर, सुहास सावरकर, राजू जेकब, अॅड. माटे, अविनाश धानेवार आदींनी निवेदन सादर केले.
गुंतवणुकदारांची रक्कम त्वरित परत करावी, कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर आणि संचालक मंडळाला त्वरित अटक करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी एजंट, गुंतवणुकदारांची उपस्थिती होती. (वार्ताहर)