मजीप्रा अभियंत्याची खुर्ची जप्त
By admin | Published: February 28, 2017 01:21 AM2017-02-28T01:21:53+5:302017-02-28T01:21:53+5:30
संपादित जमिनीचा मोबदल्यासाठी रामनगरच्या शेतकऱ्याने जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीसह तीन संगणक, फाईल जप्त केली.
संगणक, फाईलही सील : जमिनीच्या मोबदल्यासाठी न्यायालयाचा आदेश
यवतमाळ : संपादित जमिनीचा मोबदल्यासाठी रामनगरच्या शेतकऱ्याने जीवन प्राधिकरण कार्यालयातील कार्यकारी अभियंत्याच्या खुर्चीसह तीन संगणक, फाईल जप्त केली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली.
१९९४ मध्ये चापडोह प्रकल्पाकरिता रामनगर यावली येथील छगन लक्ष्मण राठोड या शेतकऱ्याची पाच हेक्टर २१ आर जमीन संपादित करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानंतरही शेतकऱ्याला वाढीव मोबदला १३ लाख रूपयांचा वाढीव मोबदला मिळाला नाही. आता त्याची रक्कम २९ लाख ८४ हजार रूपयांच्या वर गेली आहे. यामुळे शेतकऱ्याने जप्तीच्या कारवाईकरिता न्यायालयाला परवानगी मागितली. दिवाणी न्यायाधीश खडसे यांनी या संदर्भात जप्ती वॉरंट काढला. राठोड यांनी न्यायालयाचे बेलीफ ए.पी. निकम, बुध्दीराज काटपेलवार आणि जाधव यांच्या मदतीने जप्तीची कारवाई केली.
यावेळी कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर यांनी दाखल झालेल्या शेतकऱ्याला मुदत मागितली. त्यांनी वाढीव मुदत देण्यास नकार दिला. जप्त झालेले साहित्य न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. हे साहित्य ६० दिवसात न सोडविल्यास त्याचा लिलाव होणार आहे. यानंतरही शेतकऱ्याला मोबदला न मिळाल्यास संबंधितांना कारागृहात का पाठवण्यात येवू नये म्हणून नोटीस बजावली जाणार आहे, अशी माहिती शेतकरी छगन राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली. (शहर वार्ताहर)
चौथ्यांदा नामुष्की
राठोड यांनी मोबदला मिळावा म्हणून गत सात वर्षांपासून पाठपुरावा केला केला आहे. सात वर्षात चार वेळा जप्ती वॉरंट बजावला. प्रत्येकवेळी मुदत वाढवून मागण्यात आली. तर काही महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जप्तीची कारवाई झाली. मात्र मोबदला अजुनही मिळाला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत नोटीस बजावणार असल्याचे स्पष्ट केले.
पूर्वी हे प्रकरण जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांकडे होते. अचानक आमच्या कार्यालयावर जप्तीची कारवाई झाली आहे. मोबदल्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली. अजूनही मोबदला मिळाला नाही. पैसा येताच पैसा देणार आहे.
- दिनेश बोरकर, कार्यकारी अभिंयंता जीवन प्राधिकरण.