‘मजिप्रा’चा ना एसएमएस, ना फोन, विचारणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 10:17 PM2018-04-29T22:17:34+5:302018-04-29T22:17:34+5:30
पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता.
रुपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाणी समस्येवर मात करण्यासाठी जीवन प्राधिकरण व्हॉट्सअप ग्रुप तयार करेल. त्यात पाणी सोडल्या जाणाऱ्या नगराचे नाव आणि वेळ कळविण्यात येईल, असा शब्द कार्यकारी अभियंत्यांनी पालकमंत्र्यांना बैठकीत दिला होता. प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर हा कार्यक्रमही गारद झाला. काही भागात सतत चार दिवस नळ येत आहेत अन् काही भागात ४० दिवस पाणीच नाही, अशी बेभरवशाची स्थिती आहे.
यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त असणाऱ्या प्रकल्पातला पाणीसाठा संपला आहे. फ्लोटिंग पंपच्या माध्यमातून पाण्याचा उपसा सुरू आहे. संकलित पाणी टाक्यामध्ये भरून पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. कुठल्या भागात कधी पाणी सोडायचे, याचे वेळापत्रक प्राधिकरणाकडे आहे. हे वेळापत्रक नगरसेवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेतला होता. त्याची ‘अपडेट’ माहिती नगरसेवकांना दिली जाईल, अशी कबुली प्रभारी कार्यकारी अभियंता अजय बेले यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या समक्ष दिली होती.
प्रत्यक्षात बैठक संपल्यानंतर त्या दृष्टीने ग्रूप तयार झाला नाही. यामुळे कधी कुठल्या प्रभागात कुठल्या वेळी नळ येणार याची माहिती नगरसेवकांना मिळत नाही. यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही. यातून प्रत्येक भागात स्फोटक स्थिती निर्माण झाली. पाण्यासाठी मोर्चे निघत आहे. या भागातील नागरिकांना पाणी कधी मिळेल, याचे आश्वासनही देता येत नाही. यामुळे नगरसेवकांप्रती रोष वाढत आहे.
नागरिकांचे तारखांवर लक्ष
पालकमंत्र्यांसह काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यानी वारंवार अमूक तारखेपर्यंत पोहोचण्याची ग्वाही दिली होती. या तारखांकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. मात्र त्यापैकी काही तारखा उलटून गेल्या तर काही तारखा आठवडाभरावर येऊन ठेपल्यातरी शहरात पाणी पोहोचले नसल्याने नागरिकांत संताप आहे.
पाणी वाटप कोलमडले
शहरात पाणी वाटपाचे वेळापत्रकच उरले नाही. जीवन प्राधिकरणाने १२ दिवसाआड पाणी देण्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात २० ते ४० दिवसात पाणी मिळत नाही. प्रत्येक भागात किती तास नळ ठेवायचे, याचेही वेळापत्रक नाही. यामुळे कुठे दिवसभर पाणी सुरू राहते. तर काही ठिकाणी दोन तासात नळ जातात. काही भागामध्ये सतत चार ते पाच दिवस नळ राहतात. तर त्याच्याच बाजूच्या नगरात ३० ते ४० दिवसांपासून पाणी नसते. असे का होते, याचे उत्तर प्राधिकरणाने अद्यापही स्पष्ट केले नाही. यामुळे सर्वसामान्य जनतेत प्रचंड रोष आहे.