‘मजीप्रा’ची यंत्रणा ढेपाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 12:21 AM2018-01-02T00:21:37+5:302018-01-02T00:22:01+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा कमालीची ढेपाळली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ करत कामे पुढे ढकलली जात आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची यंत्रणा कमालीची ढेपाळली आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ करत कामे पुढे ढकलली जात आहे. शिवाय दुरुस्तीची कामे तकलादू केली जात असल्याने टंचाईच्या काळातही धो धो पाणी वाहत आहे. जागरूक नागरिकांनी केलेल्या सूचना झिडकारल्या जात आहे. पुढील काही महिन्यात शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. प्राधिकरणाच्या कामात सुधारणा न झाल्यास शहरावर मोठे जलसंकट उभे राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरात विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी मोठमोठ्या मशीनरीजचा वापर केला जात आहे. ही कामे करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, भारत संचार निगम याशिवाय विविध खासगी कंपन्यांचे भूमिगत जाळे तुटत असल्याने सेवा विस्कळीत होत आहे. विकास कामांसाठी होणारा त्रास नागरिकांकडूनही सहन केला जात आहे. मात्र सरकारी यंत्रणेच्या चांगल्याच जीवावर येत असल्याचे काही बाबीवरून दिसून येत आहे. केलेल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे.
खोदकाम होत असलेल्या प्रत्येक भागात प्राधिकरणाची पाईपलाईन फुटत आहे. त्यातून पाणी वाहण्यासोबतच पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. काही जागरुक नागरिकांकडून याची माहिती दिल्यानंतर प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून दुरुस्तीचे काम फुरसतीने हाती घेतले जाते. दुरुस्तीचे कामेही तकलादू केली जातात. दुसºया-तिसºया दिवशी झालेल्या कामाचे पितळ उघडे पडते. आर्णी रोडवर खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. या भागातील लोकांनी प्राधिकरणाला सूचना केली. तत्काळ दुरुस्ती करून वाहणारे पाणी थांबविण्याची तसदी प्राधिकरणाने घेतली नाही. दुसऱ्या दिवशी डागडूजी करण्यात आली. त्याच ठिकाणी जोड तुटला. पुन्हा पाण्याची गंगा वाहणे सुरू झाले. स्टेट बँक चौकातील पाईप दुरुस्तीचा कामाला तर चक्क आठवडा लावण्यात आला. नागरिकांनी तगादा लावल्यानंतर याठिकाणची नळ दुरुस्ती करण्यात आली.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचा बाऊ
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यवतमाळ विभागात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे, हे वास्तव आहे. परंतु बहुतांश कामे कंत्राटदारांमार्फत केली जात आहे. त्यांच्याकडून होत असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्याइतकेही मनुष्यबळ या विभागाकडे नाही काय, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. लहान-लहान कामांसाठी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा बाऊ केला जात आहे. शिवाय नागरिकांनी केलेल्या सूचनांवर अंमल करण्याचेही सौजन्य दाखविले जात नाही. ही परिस्थिती असेल तर या विभागाला आवश्यक तेवढे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याच गरज व्यक्त होत आहे.