‘मजीप्रा’चे काम ढेपाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:29 PM2019-02-26T21:29:00+5:302019-02-26T21:29:52+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आधीच कर्मचाऱ्यांची वानवा आहे. दैनंदिन कामकाज ढेपाळलेले असताना एकाचवेळी सात ते आठ कर्मचाऱ्यांना रजा दिली जाते. यामुळे संपूर्ण कामकाज प्रभावित झाले आहे. वसुलीसाठी अधिकारी वर्ग गल्लीबोळात फिरत आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू असल्याचे सांगितले जाते.
कर्मचारी नसल्याने कामे ठप्प पडल्याची ओरड या विभागाकडून केली जाते. अभियंत्यांपासून ते शिपायापर्यंतची अनेक पदे या विभागात रिक्त आहे. २० ते २२ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरवशावर काम ढकलले जात आहे. शहरात अनेक ठिकाणी असलेले लिकेज दिवसच नव्हे तर कित्येक महिने काढले जात नाही. यातून पाणी धो-धो वाहते. नळ जोडण्या देण्यात आलेल्या ग्राहकांना १२ महिने ते दोन वर्षपर्यंत देयक पाठविले जात नाही. एकाचवेळी दोन ते तीन हजारांचे बिल त्यांच्या माथी मारले जाते. त्यातही व्याज घेण्यात येते.
सध्या प्राधिकरणाचे कोट्यवधी रुपये ग्राहकांकडे थकीत आहे. मार्च महिना तोंडावर असल्याने वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चमू घरोघरी फिरत आहे. त्यांना ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. ही सर्व धावपळ सुरू असताना तब्बल सात ते आठ कर्मचारी एकाचवेळी रजेवर गेले आहेत. शनिवार-रविवारच्या सुट्यानंतरही सोमवार आणि मंगळवारीही सदर कर्मचारी कार्यालयात हजर झालेले नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे. येथील कार्यकारी अभियंता सोमवारी आणि मंगळवारी अकोल्याचा कारभार सांभाळतात. उर्वरित दिवस यवतमाळ येथे असतात. हीच संधी साधून कर्मचारी सुटीवर गेल्याचे सांगितले जाते. मात्र यापासून अधिकारी अनभिज्ञ कसे हा प्रश्न आहे. मात्र या सर्व प्रकारात कामकाजावर परिणाम होत आहे.
लोकांचे प्रश्न अधांतरी
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात आपल्या समस्या घेऊन जाणाऱ्या नागरिकांना कुठलाही अधिकारी उपलब्ध होत नाही. मंगळवारी कार्यकारी अभियंता नव्हते. उपविभागीय अभियंता आणि शाखा अभियंता वसुलीवर असल्याचे सांगण्यात आले. इतर कर्मचारी गप्पांमध्ये रंगले होते. अशावेळी समस्या मांडायच्या कुणाकडे हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे.