दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील त्या प्रकाराची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:23 AM2021-02-28T05:23:49+5:302021-02-28T05:23:49+5:30
दारव्हा : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भरती करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. ...
दारव्हा : येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला भरती करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. यासंदर्भात संबंधिताने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या नायक पोलीस शिपायाची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे त्यांना फोनद्वारे रुग्णालयाकडून कळविण्यात आले. त्यावरून ते दुसऱ्या दिवशी सकाळी भरती होण्याकरिता रुग्णालयात गेले असता त्यांना सेवेत असलेल्या डॉक्टरने भरती करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. त्यांना ट्रामा केअर युनिट १०.३० वाजता उघडण्यात येईल, असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले.
एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला अशी वागणूक मिळाल्याने त्या रुग्णाने थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.