मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 07:00 AM2020-05-23T07:00:00+5:302020-05-23T07:00:16+5:30

कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही...

Make Mind Strong .. Corona will go a long way too ..! | मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

मन करा रे स्ट्राँग.. यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनामुक्त व्यावसायिकाचा मंत्र उपचारासोबतच स्वत:ची इच्छाशक्ती महत्त्वाची


अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना आजाराबद्दल लोकांमध्ये भलतेच गैरसमज पसरले आहेत. पण मी स्वानुभवातून सांगतो, हा आजार बरा होतोच. स्वत:चे मन ‘स्ट्राँग’ करायचे, इच्छाशक्ती आणि रोगप्रतिकारशक्ती कायम ठेवायची. मग कोरोनाच काय कोणताही आजार पळाल्याशिवाय राहात नाही...
यवतमाळ जिल्ह्यातील पहिला कोरोनारुग्ण म्हणून ज्यांची नोंद झाली ते रमेश नारायण यमसनवार आपल्या ‘कोरोनामुक्ती’चा मंत्र सांगत होते. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच यमसनवार कुटुंब दुबईवरून परतले आणि कोरोना पॉझिटिव्ह निघाले. पहिल्यांदा रमेश यांना यवतमाळ मेडिकलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले. तर दोन दिवसांनी त्यांची पत्नी जया रमेश यमसनवार याही पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांनाही दाखल करण्यात आले. मात्र अवघ्या काही दिवसात या दोघांनीही कोरोनावर मात केली आज ते आपल्या घरी ठणठणीत आहेत.
आपला हा ‘कोरोना पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह’ असा ‘सकारात्मक’ प्रवास मांडताना रमेश यमसनवार म्हणाले, आम्ही पहिले-पहिले पेशंट होतो, तेव्हा कोरोनाची लोकांना फारशी माहितीही नव्हती. त्यामुळे गैरसमज खूप होते. कोरोना झाला म्हणजे जणू आम्ही काही गुन्हा केला की काय, असे वातावरण झाले होते. पण इतर आजारांसारखाच हाही एक आजार आहे. तोही बरा होतो. मी आणि पत्नी एकाच वेळी दवाखान्यात उपचार घेत होतो. मी मनाने स्ट्राँग होतो, पण ती जरा हळवी झाली होती. मी तिला सांगायचो.. खचला तो संपला! स्वत:वर विश्वास ठेवायचा. इम्युनिटी टिकवायची. इच्छाशक्ती कायम ठेवायची. टेन्शन घ्यायचे नाही. सारे काही ठिक होईल... या बोलण्यातून धिर मिळायचा... तिलाही अन् मलाही!
यमसनवार म्हणाले, डॉक्टर मंडळींनी खूप मेहनत घेतली. आम्ही ‘पॉझिटिव्ह’ असूनही डॉ. मिलिंद कांबळे आमच्या जवळ येऊन विचारपूस करायचे. दैनंदिन ताप चेक करणे, औषधी देणे सुरू होते. रोज अ‍ॅन्टीबायोटिक गोळ्या सुरू होत्या. आमचा दुसरा-तिसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर आम्हाला घरी सोडण्यात आले. १४ दिवस होमक्वारंटाईन करण्यात आले. पण आम्ही स्वत:हून ३५ दिवस घराबाहेर निघालोच नाही. या क्वारंटाईन काळात नातेवाईक जेवणाचा डबा आणून द्यायचे, त्यांनाही आम्ही संपर्क टाळण्यासाठी घरात घेतले नाही. मन रमविण्यासाठी घरातल्या घरात व्यायाम करणे, टिव्हीवर आवडते कार्यक्रम पाहणे, जगदंबा देवीची भक्ती करणे हा आमचा दिनक्रम होता. आता ३५ दिवसानंतर मी माझा कृषी केंद्राचा व्यवसायही पूर्वीप्रमाणे सुरू केला आहे.
आजारावर निश्चित उपचार नसताना डॉक्टरांची मेहनत, माझी स्वत:ची इच्छाशक्ती, माझ्या परिसरातील लोकांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थना आणि जगदंबा देवीची कृपा यामुळे मी कोरोनातून पूर्णपणे बरा झालो...

माझ्यामुळे इतरांना त्रास नको!
रमेश यमसनवार म्हणाले, दुबईहून आल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह निघालो अन् रुग्णालयात भरती झालो. पण माझ्या संपर्कात आलेल्या इतरांना काही होणार तर नाही ना, याबाबत सतत चिंता सतावत होती. म्हणून रुग्णालयातून त्या सर्वांना सतत फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत होतो. सुदैवाने माझ्यामुळे इतर कोणालाही लागण झाली नाही, याचे समाधान आहे. आम्ही पती-पत्नी रुग्णालयात असताना आमचा मुलगा सारंग पुण्यात उपचार घेत होता. पण आता आम्ही तिघेही कोरोनामुक्त झालो.

मास्क लावणे म्हणजे ९५ टक्के सुरक्षा
सरकार कितीही प्रयत्न करीत असले तरी आपली सुरक्षा आपल्याच हाती आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्क लावलाच पाहिजे. मास्क लावला तर दुसऱ्या कोणत्याच उपायाची गरज नाही. तिच आपली ९५ टक्के सुरक्षा आहे. लोकांनी गर्दीत जाऊ नये, गेलेच तर काळजी घेऊन वावरा. कोरोनामुक्त झाल्यावर मी शहरातील आणि खेड्यातीलही नागरिक पाहिले. पण कोरोनाबाबत खेड्यातील अडाणी माणसेच अधिक जागृत असल्याचे मत यमसनवार यांनी नोंदविले.

कोरोना आजार उलटून येत नाही
आम्ही कोरोनामुक्त झालो तरी अनेक लोक आमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा आजार एकदा बरा झाल्यावर पुन्हा उलटून येत नाही. कोरोनामुक्त झालो म्हणजे आम्ही पूर्वीप्रमाणेच ‘सामान्य’ झालो आहोत. क्वारंटाईन पिरेडनंतर आमच्यापासून कोणालाही कोणताही धोका नाही. आम्हाला घाबरणे म्हणजे अंधश्रद्धा बाळगणे होय, असे रमेश यमसनवार म्हणाले.

Web Title: Make Mind Strong .. Corona will go a long way too ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.