आजंती येथे मलकोजी यात्रा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:57 PM2018-02-24T21:57:50+5:302018-02-24T21:57:50+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे.
ऑनलाईन लोकमत
नेर : संपूर्ण महाराष्ट्रात भक्त मंडळी असलेल्या आजंती खाकी येथील मलकोजी महाराजांच्या यात्रेला पाचशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. यावर्षीच्या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. दोन दिवसांचा हा उत्सव ग्रामस्थ आंनदाने साजरा करतात.
मलकोजी महाराज सन १४९९ ला चांदूररेल्वे तालुक्याच्या वाकपूर (दादापूर) येथून आजंतीला आले. त्यांनी राऊळ (मंदिर) बांधण्यासाठी ग्रामस्थांना जागा मागितली. सुरुवातीला ग्रामस्थांनी नकार दिला. नंतर जागा मिळाल्यानंतर मलकोजी महाराजांनी कारंजा लाड येथून कारागिरांना बोलावून मंदिर बांधकामाला सुरुवात केली. ई.स. १४९९ ते १५७० या काळात मोगल बादशाहाची सत्ता होती. मलिन नावाचा राजा मंदिरे उद्ध्वस्त करत होता. राज्याने मंदिर पाडू नये म्हणून मंदिराचा समोरील भाग मशिदीसारखा बांधण्यात आला. मूळ मलकोजी शामजी ढळे यांची १५७१ साली समाधी बांधण्यात आली. त्यांना आशा व मनिशायी या दोन पत्नी होत्या. त्यांना संभाजी, निंबाजी, चिंताजी ही तीन मुले होती. चितांजीच्या पाचव्या पिढीतील नागोजी ढळे यांच्या मंदिरात समाध्या आहेत. हे मंदिर एकात्मतेचे प्रतीक आहे.
दर गुरुवारी याठिकाणी भक्तांची मांदियाळी असते. महाराज घोंगटीतून हात घालून गरिबांना राणी छाप नानी वाटायचे. मंदिराचा खर्च याच नाण्यातून करण्यात आला, असे सांगितले जाते. २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तमाम भक्त महाप्रसादाचा लाभ घेतील. उत्सवासाठी भक्त मंडळी पुढाकार घेत आहे.