शहर पोलीस ठाण्यात युवाकाचा शिपायावर हल्ला; तासभर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 04:38 PM2022-06-23T16:38:51+5:302022-06-23T16:55:14+5:30
आरोपीने शिपायावर हल्ला करून मारहाण करीत त्याच्या अंगावरचे कपडे फाडले.
यवतमाळ : नशेत असलेल्या आरोपीने स्टेट बॅंक चौकात पोलीस शिपायाला चाकू लावून मोबाईल मागितला. यावरून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर या आरोपीने पोलीस शिपायावर हल्ला केला. त्याच्या अंगावरील कपडे फाडत शिवीगाळ केली. हा राडा बुधवारी दुपारी झाला.
पवन कापशीकर रा. चांदूर रेल्वे असे आरोपीचे नाव आहे. तो दोन चाकू बाळगून स्टेट बॅंक चौकात एका बार समोर उभा होता. त्याने शहर ठाण्यातील साध्या गणवेशातील पाेलीस शिपायाला चाकू लावत मोबाईल मागितला. धारदार चाकू पाहून पोलीस शिपायाने याची माहिती पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्याला पकडून शहर पोलीस ठाण्यात आणले. तेथेही आरोपीने पोलिसांंना शिवीगाळ सुरू केली. सुहास उईके नामक शिपायावर हल्ला करून मारहाण करीत त्याच्या अंगावरचे कपडे फाडले.
घटनेचा प्रकार माहीत होताच शहर ठाणेदार नंदकुमार पंत पोलीस ठाण्यात पोहोचले. तरीही आरोपी गोंधळ घालत होता. त्या आरोपीचा भाऊ यवतमाळात राहतो, त्यालाही बोलाविण्यात आले. मात्र तो भावाचे ही ऐकत नव्हता. भावालाही शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सावध पवित्रा घेत त्या युवकाची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत कारवाई न करता सोडून दिले.
दुपारच्या जेवणात अडथळा
पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले कर्मचारी जेवणासाठी डबे उघडून बसले होते. दोन घास घेणार तोच गांजाच्या नशेत तर्रर असलेल्या त्या युवकाने गोंधळ घालणे सुरू केले. त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकत नव्हता. पोलिसांवर हल्ला त्याने केला. त्यामुळे दुपारचे जेवणही कर्मचाऱ्यांना घेता आले नाही.