पावसात जोडप्याला दिला आसरा अन् ते ५० हजारांसह दागिने घेऊन फरार झाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 04:50 PM2022-07-05T16:50:06+5:302022-07-05T16:57:43+5:30
संधीचा फायदा घेत भामट्यांनी तडस यांना बोलण्यात गुंतवून ५० हजारांंची रोख व १८ हजारांचे दागिने लंपास केले.
यवतमाळ : अडचणीत आलेल्यांना मदत करावी की नाही, अशी काहीशी परिस्थिती आहे. डजोरदार पाऊस आल्याने आडोश्याला थांबलेल्या जोडप्यासह तिघांना घरात आसरा दिल्यानंतर या भामट्यांनी घरमालकाच्या घरातील ५० हजारांसह दागिने घेऊन पोबारा केला.
शहरातली चापडोह परिसरात शनिवारी दुपारच्या सुमारास पाऊस सुरू झाला. या पावसात दोन महिला व पुरुष तिघेजण आडोसा शोधत होते. दुचाकी थांबवून ते तुळशीराम काशीनाथ तडसे यांच्या घरात शिरले. तडस यांच्याकडे त्यांनी पाऊस जाईपर्यंत थांबू द्या, अशी विनवणी केली. यावर घरधन्यानेही मोठ्या मनाने त्यांना पाऊस थांबेपर्यंत बसण्यास सांगितले.
दरम्यान, यातील एकजण तुळशीराम तडसे यांच्याजवळ बसून त्यांना गोष्टी सांगू लागला. बोलण्यात गाफील ठेवून उरलेल्या दोघींनी घरात जाऊन कपाटातील लॉकरमधून ५० हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने १८ हजार असा एकूण ६८ हजारांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केला. हा प्रकार लक्षात येताच रविवारी तुळशीराम तडसे यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून चोरी झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.