वाद पेटला; भावानेच दारूड्या भावाचा काटा काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 04:58 PM2021-12-14T16:58:42+5:302021-12-14T18:12:00+5:30
किसनचे घरगुती वापराचे साहित्य रामदासच्या ताब्यात असलेल्या वडिलोपार्जित घरात ठेवलेले होते. यावरूनच रामदास किसनसोबत सोमवारी सकाळपासूनच वाद करीत होता. दारूच्या नशेत सतत त्याची कटकट सुरू होती.
यवतमाळ : लहान भाऊ दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला. त्यामुळे कुटुंबातील इतर जणही त्याच्यापासून त्रस्त होते. मोठ्या भावाने मोठ्या मनाने लहान्याला वडिलोपार्जित राहते घर दिले. त्या ठिकाणी मोठ्या भावाचे साहित्य ठेवलेले होते. यावरून लहान सतत मोठ्याशी वाद घालत होता. सोमवारी रात्री असाच वाद पेटला. रागाच्या भरात मोठ्या भावाने काठीने वार केला तो लहान्याच्या वर्मी बसला. त्यातच त्याचा जागेवर मृत्यू झाला.
रामदास वासुदेव गाडेकर (२७) रा. नांझा ता. कळंब असे मृताचे नाव आहे. त्याला किसन वासुदेव गाडेकर (२९) याने काठीने मारहाण केली. काठीचा वार डोक्यावर बसताच रामदास जागेवर कोसळला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री ९.३० वाजता दरम्यान घडली. किसनचे घरगुती वापराचे साहित्य रामदासच्या ताब्यात असलेल्या वडिलोपार्जित घरात ठेवलेले होते. यावरूनच रामदास किसनसोबत सोमवारी सकाळपासूनच वाद करीत होता. दारूच्या नशेत सतत त्याची कटकट सुरू होती.
किसन प्रतिसाद देत नसल्याचे पाहून रामदासने त्याचे साहित्य घराबाहेर फेकून दिले. हे पाहून किसनचा संयम सुटला व त्याने काठीने मारहाण सुरू केली. या घटनेची माहिती पोलीस पाटील विठ्ठल शेषराव तोडासे यांनी कळंब ठाणेदार अजित राठोड यांना दिली. तत्काळ पोलीस उपनिरीक्षक किशोर मावसकर यांनी नांझा हे गाव गाठले. तेथे आरोपी किसन याला अटक केली. तर रामदासचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. या प्रकरणी पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.