मोबाईलचा गैरवापर; शाळकरी मुलीवर लादले मातृत्व, तरुणाला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2022 10:49 AM2022-01-16T10:49:59+5:302022-01-16T11:03:07+5:30
मोबाईलच्या संभाषणातून दोघांत प्रेम फुलले. लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र ऐनवेळी त्याने लग्नासाठी नकार दिला. आता हे प्रकरण मारेगाव पोलीस ठाण्यात गेले आहे.
यवतमाळ : कोरोनानंतर शाळा बंद झाल्याने ऑनलाईन शिक्षणासाठी हाती मोबाईल आला. यातूनच एका तरुणाचे एका शाळकरी मुलीशी प्रेमसंबंध जुळले. लग्नाचे आमिष दाखवून जवळीक साधत तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. यातून तिला गर्भधारणा झाली. मात्र ऐनवेळी त्याने लग्नासाठी नकार दिला. आता हे प्रकरण मारेगाव पोलीस ठाण्यात गेले आहे. पीडितेच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाविरूद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
तालुक्यातील एका गावात राहणारी पीडिता मागील वर्षी १० व्या वर्गात शिक्षण घेत होती. गरीबीत जीवन जगणाऱ्या तिच्या पालकांनी आपली मुलगी शिकावी, म्हणून ऑनलाईन शिक्षणासाठी घरातील वस्तू विकून मुलीला स्मार्टफोन घेऊन दिला. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी हाती मोबाईल आल्यानंतर तिची बिहाडीपोड येथील एका तरुणाशी मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
पीडिता तासन्तास मोबाईलवर बोलत असल्याची बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. शेजाऱ्यांनी पीडितेच्या पालकांना या विषयात सतर्क केले. त्यानंतर आईने मुलीला याबाबत विचारणा केली. तेव्हा अल्पवयीन पीडितेने माझे एका मुलावर प्रेम असून आम्ही लग्न करणार असल्याची माहिती आईला दिली. याच काळात मुलीला दिवस गेल्याचेही कळले आणि पालकांच्या पायाखालची वाळूच सरकली. पालकांनी तत्काळ रामचरण आत्राम याला घरी बोलावून विचारपूस केली. तेव्हा त्याने प्रेमाची कबुली देत लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. जवळच्या नातलगाचा मृत्यू झाल्याने एक महिन्यानंतर लग्न करू, असे त्याने पीडितेच्या पालकांना सांगितले.
रामचरणच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडितेच्या पालकांनी एक महिना वाट पाहिली. एक महिन्यानंतर त्याला लग्नासाठी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत लग्न करण्यास नकार दिला. तसेच याबाबत पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील त्याने दिली. मात्र त्याच्या धमकीला न जुमानता मुलीच्या पालकांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी रामचरण मानिराम आत्राम याच्याविरुद्ध पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.