बायको घरी येत नाही म्हणून युवकाने पोलिस ठाण्यापुढे घेतले विष
By अविनाश साबापुरे | Published: June 26, 2023 12:05 PM2023-06-26T12:05:37+5:302023-06-26T12:09:58+5:30
पुसदमधील प्रकार : गुन्हा दाखल, उपचार सुरू
पुसद (यवतमाळ) : बायको माझ्यासोबत यायला तयार नाही, अशी आरडाओरड करीत एका युवकाने चक्क पोलिस ठाण्याच्या आवारात विष प्राशन केले. पोलिसांनी या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचावर उपचारा सुरू आहेत. येथील वसंतनगर पोलिस ठाण्याच्या पुढे हा प्रकार घडला.
बादल देवसिंग चव्हाण (३२) रा. देवतांडा सांडवा-मांडवा, असे या युवकाचे नाव आहे. तो रविवारी वसंतनगर पोलिस ठाण्याच्या आवारात दाखल झाला आणि जोरजोरात ओरडू लागला. ‘माझी नाणी सासू माझ्या बायकोला माझ्यासोबत माझ्या घरी पाठवत नाही. बायकोसुद्धा माझ्यासोबत घरी यायला तयार नाही’, असे ओरडत त्याने अचानक खिशातून विषाची बॉटल काढून विष प्राशन केले.
पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही कळण्याच्या आतच सदर घटना घडल्यामुळे खळबळ उडाली. त्याला तत्काळ येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सदर युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश रामचंद्र इंगळे यांच्या फिर्यादीवरून कलम ३०९ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.