चिमुकल्या मानवीचा काकूनेच केला ‘अमानवी’ खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 05:34 PM2021-12-27T17:34:40+5:302021-12-27T17:51:47+5:30
२० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे.
यवतमाळ : खुदूखुदू हसणारी तीन वर्षांची मानवी ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. आठवडाभर सर्वत्र शोध घेवून आई-वडील थकले. पोलिसांनीही हात टेकले. आर्णी तालुक्यातील कुऱ्हा डुमनी गावातील या घटनेत अखेर रविवारी रात्री धक्कादायक खुलासा पुढे आला. मानवीच्या काकूनेच तिला मारुन टाकले आणि आठवडाभर घरातच गव्हाच्या कोठीत दाबून ठेवले. पोलिसांनी आरोपी काकूला ताब्यात घेतले आहे. या थरारक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
मानवी अविनाश चोले असे मृत बालिकेचे नाव आहे. तर दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले (२८) असे मारेकरी काकूचे नाव आहे. दि. २० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घरातच खेळत असलेली मानवी अचानक बेपत्ता झाली होती. त्यामुळे तिचे वडील अविनाश आणि आई ममता उर्फ पूजा यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर आर्णी पोलिसांत तक्रार दाखल केली.
मानवीच्या शोधासाठी पोलिसांसह गावकऱ्यांनीही जंगजंग पछाडले. मात्र मानवीचा कुठेही सुगावा लागत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी शेजाऱ्यांवरच लक्ष केंद्रित केले. शेवटी रविवारी खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी कुऱ्हा डुमनी गाव गाठून दिवसभर माग काढला. रात्री ९च्या सुमारास संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. मानवीच्या घराशेजारी राहणाऱ्या चुलत काकूनेच सात दिवसांपूर्वी तिचा खून करून घरातील गव्हाच्या कोठीत तिचा मृतदेह दाबून ठेवल्याचे उघडकीस आले. पोलिसांचे प्रयत्न यशस्वी झाले मात्र चिमुकल्या मानवीचा जीव वाचविण्यात कुणालाच यश आले नाही.
पोलिसांनी तातडीने मानवीची काकू दीपाली उर्फ पुष्पा गोपाल चोले हिला ताब्यात घेतले आहे, तर मानवीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळला पाठविण्यात आला. दीपालीसह कुटुंबातील आणखी दाेघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांंनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण केले होते. ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील भुजबळ, दारव्हा एसडीपीओ आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ एलसीबी पथक प्रमुख प्रदीप परदेशी, आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव, मनोज चव्हाण, सतीश चौधर, अमित झेंडेकर, किशोर झेंडेकर, विजय चव्हाण आदींनी पार पाडली.
* संबंधित बातमी : तीन वर्षीय चिमुकलीच्या अपहरणामुळे खळबळ