९५० वर्षांपूर्वीचे मनदेव देवस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 12:09 AM2019-08-12T00:09:03+5:302019-08-12T00:09:30+5:30
यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.
शिवानंद लोहिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : यवतमाळ - आर्णी मार्गावरील मनदेव येथे निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाडपंथी शिवालय आहे. सुमारे ९५० वर्षांपूर्वी या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. श्रावण महिन्यात या शिवालयात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळते.
प्राचीन वास्तूकलेचा अप्रतीम नमुना म्हणून या मंदिराकडे बघितले जाते. रामदेव राय यादव यांच्या कालखंडात ११५५ मध्ये या मंदिराची निर्मिती झाल्याचे आढळून येते. रामदेव राय यादव यांचे पंतप्रधान हेमांद्री पंत यांनी हे मंदिर बांधल्याची नोंद नांदगाव खंडेश्वर येथील मंदिरावर असलेल्या शिलालेखात आढळते. महादेवाच्या साडेतीन पीठांपैकी मनदेव हे एक पीठ आहे. या मंदिरात सुमारे १५० वर्षांपूर्वी पुजारी म्हणून रेवा भारती कार्य करीत होते. त्यांची मंदिराजवळ समाधी आहे. त्यावर महादेवाची पिंड ठेवण्यात आली होती. नंतर तेथे वाढलेल्या वटवृक्षामुळे हे पिंड गडप झाली आहे. यानंतर झाडाच्या आसपासचा भाग कापून मोकळा केला, असे पुजारी महादेव राऊत यांनी सांगितले.
मंदिराच्या पूर्वेस कालभैरवाची मूर्ती आहे. उत्तर आणि दक्षिणेस सभागृह आहे. येथेच साईबाबांचे मंदिर आहे. मंदिरामागे तीर्थकुंड आहे. पूर्वेकडे मारुतीचे मंदिर तर आकाशाच्या छताखाली नागराज विराजमान आहे. या मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी उसळते.