सुवर्ण कारागिरच निघाला मंगळसूत्र चोर

By admin | Published: June 23, 2017 01:45 AM2017-06-23T01:45:15+5:302017-06-23T01:45:15+5:30

शहरात मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहे.

Mangalasutra thief left the golden craftsman | सुवर्ण कारागिरच निघाला मंगळसूत्र चोर

सुवर्ण कारागिरच निघाला मंगळसूत्र चोर

Next

दर्डानगरातील घटना : सोन्याची केली गलाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहे. मात्र पोलिसांनाही आरोपीचा सुगावा मिळत नव्हता. अखेर वडगाव रोड ठाण्याच्या शोध पथकाने तीन महिन्यांपासून एका सराफा कारागिरावर पाळत ठेवली. शेवटी त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून आरोपीला बुधवारी सराफा बाजारपेठेतून अटक करण्यात आली.
सचिन नारायण चित्रीव (३५) रा. शास्त्रीनगर असे अटकेतील सोनसाखळी चोरट्याचे नाव आहे. सचिनने अनेक वर्षे सुवर्ण कारागीर म्हणून काम केले. नंतर त्याने शारदा चौकात स्वत:चे दुकान सुरू केले. दीड-दोन वर्ष व्यवसाय केल्यानंतर त्याने सोनसाखळी चोरीचा उद्योग सुरू केला. दुचाकीवर जाऊन पायदळ जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकायचे, हा त्याचा नित्यक्रम बनला. त्याने दाते कॉलेज, दर्डानगर, उज्वलनगर, राणाप्रतापनगर परिसरातून अनेक महिलांचे मंगळसूत्र उडविले.
सचिन चोरीच्या मंगळसूत्राची गलाई करून त्यांच्या लगडी (कांड्या) बनवत होता. नंतर त्याची तो विक्री करीत होता. वडगाव रोड पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने त्याला दोनदा रंगेहाथ पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो दरवेळी पळून जाण्यात यशस्वी ठरला. शेवटी बुधवारी रात्री त्याला सराफा बाजारपेठेतून अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक सुगत पुंडगे, सुरेश मसराम, रावसाहेब शेंडे, अन्सार बेग, गौरव नागलकर, आशिष चौबे, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर यांनी केली.

सोन्यासह दुचाकी जप्त
सचिनने मंगळवारी रात्री दर्डानगर येथे केलेल्या चोरीची कबुली दिली. कमल मधुकर कांबळे, रा. रंभाजीनगर यांचे १७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून त्याने पळ काढला होता. पोलिसांनी त्याच्याकडून १० ग्रॅम सोने व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच.२९-ए.एल.१५४५) जप्त केली.

Web Title: Mangalasutra thief left the golden craftsman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.