तीन दिवसांपासून मंगीची शाळा उघडलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 09:56 PM2018-12-31T21:56:12+5:302018-12-31T21:56:56+5:30
शिक्षकच आले नसल्याने जिल्हा परिषदेची शाळा मागील तीन दिवसांपासून उघडलीच गेली नाही. हा प्रकार मंगी (ता.राळेगाव) येथे सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाऊन परत यावे लागत आहे. वरिष्ठांकडूनही हा प्रकार गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
मंगेश चवरडोल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वडकी : शिक्षकच आले नसल्याने जिल्हा परिषदेची शाळा मागील तीन दिवसांपासून उघडलीच गेली नाही. हा प्रकार मंगी (ता.राळेगाव) येथे सुरू आहे. परिणामी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाऊन परत यावे लागत आहे. वरिष्ठांकडूनही हा प्रकार गांभीर्याने घेतला जात नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
मंगी येथील जिल्हा परिषद शाळेत एक ते पाच वर्ग असून पटावर ३६ विद्यार्थी आहेत. सकाळी १० ते ५ अशी शाळेची वेळ आहे. २८ डिसेंबरपासून शाळेच्या आज (सोमवारी) तिसऱ्या दिवशीही शाळेचे प्रवेशद्वार उघडले गेले नाही. विद्यार्थी दिवसभर शिक्षकांची वाट पाहतात.
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या या शाळेची दैना जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य आणि वरिष्ठांकडूनही दुर्लक्षित आहे. खैरी केंद्रशाळे अंतर्गत मंगी शाळा येते. वर्ग भरत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये कमालीची नाराजी व्यक्त होत आहे. शाळा न उघडल्यास आणि आवश्यक तेवढे शिक्षक न दिल्यास पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना शिक्षण विभागाला काहीही सोयरसुतक नाही.
गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष
मंगी येथील शाळेत नियमित शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शुक्रवार, शनिवार, सोमवार असे तीन दिवस शाळा उघडली नाही. केंद्र प्रमुख, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली, त्यांनी दुर्लक्ष केले. अजूनही उपाययोजना न झाल्यास विद्यार्थ्यांसोबत राळेगाव पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार असल्याचे मंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दशरथ राऊत यांनी सांगितले.
दोनही शिक्षक गैरहजर
मंगी शाळेला दोन शिक्षक मंजूर आहे. त्यातील एक कायम, तर एक प्रतिनियुक्तीवर आहे. २८ डिसेंबरपासून एकही शिक्षक शाळेत पोहोचले नाही. शिक्षकांच्या गैरहजेरीविषयी पंचायत समितीचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना बोलून संबंधित शिक्षक व केंद्र प्रमुखांवर कारवाई केली जाईल. जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीतही हा विषय घेतला जाईल.
- प्रीती काकडे,
सदस्य, जिल्हा परिषद