मॅन्युअल टंकलेखन निर्णयाचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:59 AM2019-08-05T11:59:20+5:302019-08-05T12:00:47+5:30
दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेल्या मॅन्युअल टायपिंगला प्रवेशाविषयी परीक्षा परिषद द्विधा मनस्थितीत आहे. नवीन सत्राला प्रवेश बंदचा निर्णय नऊ दिवसात बदलविल्याने ही बाब स्पष्ट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन वर्षांची मुदतवाढ मिळालेल्या मॅन्युअल टायपिंगला प्रवेशाविषयी परीक्षा परिषद द्विधा मनस्थितीत आहे. नवीन सत्राला प्रवेश बंदचा निर्णय नऊ दिवसात बदलविल्याने ही बाब स्पष्ट होत आहे. परिषदेचा सुरू असलेला हा खेळखंडोबा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे.
शासकीय कार्यालयाचे संपूर्ण कामकाज संगणकावर चालत आहे. काळानुरूप बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे सांगत शासनाने सन २०१७ मध्ये मॅन्युअल टायपिंग थांबविण्याचा निर्णय घेतला. कॉम्प्युटर टायपिंग सुरू करण्यात आली. मात्र काही टायपिंग इन्स्टिट्यूटने पाठपुरावा केल्याने मॅन्युअल टायपिंगला नोव्हेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जुलै २०१९ ची परीक्षा मॅन्युअल टायपिंगवर झाली.
मुदतवाढीनुसार जुलै ते डिसेंबर २०१९ हे सत्र शिल्लक आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी २५ जुलै २०१९ च्या पत्रानुसार या शिल्लक असलेल्या सत्राला विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे टायपिंग इंस्टिट्यूट संस्थांना कळविले. तसी प्रसिध्दीही झाली. मात्र परिषदेने २ आॅगस्ट रोजी सदर पत्र रद्द केले. रद्द करण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. आता विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रवेश थांबविण्याचा निर्णय परिषदेने का घेतला आणि लगेच का बदलविला, याची चर्चा आता टायपिंग इंन्स्टिट्यूट क्षेत्रात सुरू झाली आहे.
कॉम्प्युटर टायपिंगचे विद्यार्थी वाढले
राज्यातील सुमारे ३५०० टायपिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मॅन्युअल टायपिंगची परीक्षा देणारे २०१४ मध्ये दोन लाख ९० हजार ३८४ विद्यार्थी होते. जुलै २०१९ या सत्रात केवळ ६२ हजार ८३३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. याच सत्रात कॉम्प्यूटर टायपिंगची परीक्षा देणारे दोन लाख २५ हजार विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षात कॉम्प्यूटर टायपिंगचे विद्यार्थी वाढले आहेत.
शासनाने मॅन्युअल टंकलेखन परीक्षेला दोन वर्षे मुदतवाढ दिली आहे. यानुसार जुलै ते डिसेंबर २०१९ हे शेवटचे सत्र आहे. या सत्राला प्रवेश देऊ नका, असे परीक्षा परिषद आयुक्तांनी २५ जुलैच्या पत्रात नमूद केले होते. या आदेशासंदर्भातील पत्र रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाचे स्वागत करतो.
- प्रकाश कराळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटना
परीक्षा परिषद आयुक्त पुणे यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना केवळ परीक्षा घेण्याचा अधिकार आहे. ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर पत्र रद्द करण्यात आले. कुठलाही निर्णय शासनाच्या निर्देशानुसार होणे अपेक्षित आहे.
- दिनेश हरणे, अध्यक्ष, मॅन्युअल टायपिंग संघर्ष समिती