पांढरकवडा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती समस्यांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:48 AM2021-09-15T04:48:18+5:302021-09-15T04:48:18+5:30
तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव ...
तालुक्यातील गावांचा फेरफटका मारला असता, गावातील समस्यांची वास्तविकता निदर्शनास येते. अनेक गावांत घरोघरी शौचालये नाहीत. गावाच्या सुरुवातीलाच हागणदारीमुक्त गाव असे मोठमोठे फलक लागले आहेत. परंतु त्या फलकाशेजारीच सर्वत्र घाण पसरलेली दिसून येते. यावरून प्रत्यक्षात ती गावे हागणदारीमुक्त नाहीत, हे दिसून येते. गावात सांडपाण्याचे नियोजन दिसून येत नाही. सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसून येते. कित्येक ग्रामपंचायतींच्यासमोरच सांडपाणी वाहताना दिसते. त्यामुळे जिकडे तिकडे घाण पसरल्याचे दिसून येते. काही गावात नाल्या आहेत. त्याही कचऱ्याने बुजलेल्या अवस्थेत आहे. स्वच्छतागृहे स्वछ नसल्याचे दिसून येते. स्वच्छ पिण्याचा पाणीपुरवठा होत नाही. कित्येक गावात फ्लोराईडयुक्त पाण्याचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर होताना दिसून आले. साथ रोगापासून बचाव करण्यासाठी कुठलीही उपाययोजना सुरू असल्याचे दिसून येत नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कित्येक योजनांमध्ये, मोहिमांमध्ये या गावांनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले जाते. परंतु तो सहभाग नावापुरताच दिसून येत आहे. काही गावात तर दारूचा महापूर दिसून येतो. त्यावर कुणाचाही वॉच दिसून येत नाही. दारूमुळे अनेक समस्या गावात निर्माण होत आहेत. या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध होत असताना या निधीचा विनियोग कशा पद्धतीने होत आहे, हे कळायला मार्ग दिसत नाही. काही मोजक्या ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाला. परंतु पुरस्कार मिळाल्यानंतर त्या गावची परिस्थिती ‘जैसे थे’च झाली आहे. सध्या ग्रामपंचायतींना मोठे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्याचा उपयोग अनेक उपक्रम राबवून अनेक लोकोपयोगी योजना ग्रामवासीयांना देता येऊ शकतात. मात्र, लोकांची निरूत्साही वृत्ती, केवळ मलिद्याकडे लक्ष देणारे पुढारी व प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येत आहे.