नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी घरीच मारली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 05:00 AM2022-01-02T05:00:00+5:302022-01-02T05:00:30+5:30
ढाबे, हाॅटेल, बीअरबार या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. यंदा मात्र कोरोना निर्बंधामुळे या पार्ट्यांचे नियोजन शेवटच्या वेळेपर्यंत झाले नाही. हाॅटेल सुरू ठेवण्याची मुभा किती वाजताची आहे हेही वेळेवर निश्चित झाले. त्यामुळे व्यावसायिकांना थर्टी फर्स्टचा इव्हेन्ट कॅश करता आला नाही. पोलीस कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी अशा ठिकाणी जाणेही टाळले.
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नववर्षाचे स्वागत बेधुंद होऊन करण्याची प्रथाच पडली आहे. अशा तळीरामांचा बंदोबस्त करण्यासाठी पाेलीसही सरसावले असतात. ३१ डिसेंबरच्या रात्री जिल्हाभर कडेकोट बंदोबस्त लावला जातो. दंडात्मक कारवाईही केली जाते. उगाच नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये म्हणून आता खबरदारी घेतली जात असल्याचे यंदा दिसून आले. अनेकांनी आपल्या निर्धारित ठिकाणीच नववर्षाचा जल्लोष केला तर काहींनी घरातच बैठक मांडली. त्यामुळे पोलिसांना केवळ २७ तळीरामच हाती लागले.
ढाबे, हाॅटेल, बीअरबार या ठिकाणी नववर्षाच्या स्वागताच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. यंदा मात्र कोरोना निर्बंधामुळे या पार्ट्यांचे नियोजन शेवटच्या वेळेपर्यंत झाले नाही. हाॅटेल सुरू ठेवण्याची मुभा किती वाजताची आहे हेही वेळेवर निश्चित झाले. त्यामुळे व्यावसायिकांना थर्टी फर्स्टचा इव्हेन्ट कॅश करता आला नाही. पोलीस कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी अशा ठिकाणी जाणेही टाळले.
जिल्ह्यातील सहा पोलीस उपविभागात दारू पिऊन वाहन चालविताना २७ जणांविरुद्ध कारवाई केली तर इतर कलमांचा आधार घेऊन ४३३ जणांकडून दंड वसूल करण्यात आला. रात्रभऱ्याच्या कारवाईत पोलिसांनी २ लाख २७ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल केला. नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच पोलीस रस्त्यावर आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. अपघातासारख्या घटनाही टाळता आल्या. नववर्षाचा जल्लोष करताना यापूर्वी अनेक अप्रिय घटना कानावर येत होत्या.
दहा हजार लिटर दारूची रात्रीतून विक्री
- पिने वालोको पिने का बहाना चाहिए, त्यातही नवीन वर्ष स्वागताचा जल्लोष पिणारे करणार नाही तर नवलच. रस्त्यावर न येता सुरक्षित ठिकाण निवडून मद्यपींनी नववर्षाचे स्वागत केलेच. या एका रात्री जिल्ह्यात दहा हजार लिटर दारूची विक्री झाली. त्यात देशी, विदेशी, वाईन, बीअर या सर्व प्रकारच्या मद्यांचा समावेश आहे. दारू पिऊन नववर्षाचे स्वागत करणे चुकीचे असले तरी हा पायंडा दरवर्षी न चुकता जोपासला जात आहे.
रात्रीच्या जल्लोषाची दिवसाच केली तयारी
- पार्टी करायची मात्र पोलीस कारवाई झालीच नाही पाहिजे, अशी खबरदारी घेण्यात आली. ३१ डिसेंबरचा जल्लोष साजरा करण्यासाठी दिवसाच परिपूर्ण तयारी करण्यात आली. अनेकांनी शेतशिवारातील राहुट्यांवर पार्टीचे नियोजन केले. त्या ठिकाणी संपूर्ण रात्र काढता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली. यवतमाळ शहरालगत अनेकांनी फार्महाऊस तयार केले आहे. ज्यांना शक्य झाले नाही, त्यांनी घरातच नियोजन करून ठेवले होते.
नववर्षाचे स्वागत करताना प्रत्येकाने कायदा पाळावा ही पोलिसांची अपेक्षा असते. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली होती. जिल्हाभर तपासणी नाके व पोलीस पेट्रोलिंग सुरू होते. यंदा कुठेही नववर्षाचे स्वागत करताना हुल्लडबाजी झालीच नाही. इतकेच काय ढाबे, हाॅटेलवरही दरदिवशी पेक्षाही कमी गर्दी दिसून आली.
- रामकृष्ण महल्ले
प्रभारी गृहउपअधीक्षक
हाॅटेलमध्ये शुकशुकाट
- हाॅटेल, ढाब्यांवर नववर्षाचा जल्लोष रंगलाच नाही. अनेकजण १० च्या आतच घरात जमा झाले. नियमितपणे हाॅटेलचा जो व्यवसाय होतो, तितकाही यंदा झाला नाही. यावरून नागरिकांमध्येही जाणीवजागृती किंवा पोलीस कारवाईचा धाक असल्याचे दिसून येते. परिणामी सर्वत्र शुकशुकाट होता.