अनेक घरांवरील टीनपत्रे उडाली
By admin | Published: March 1, 2015 02:06 AM2015-03-01T02:06:23+5:302015-03-01T02:06:23+5:30
दिग्रस शहरात शनिवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली.
यवतमाळ : दिग्रस शहरात शनिवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वादळाला सुरुवात झाली. वाऱ्याच्या वेगाने अनेक घरावरील टीनपत्रे उडून गेली. त्यामुळे घरे उघडी झाली. तसेच पाऊस कोसळल्याने घरातील अन्न धान्य, कपडे लत्ते ओले झाले. शहरातील होलटेकपुरा, शनिमंदिर चौक आदी परिसरात मोठे नुकसान झाले. राजाभाऊ निलावार यांच्या शनिमंदिर चौकातील घरावरील टिनाची कैचीपूर्णपणे उडून एका झाडावर अडकली. देवनगर परिसरात नारायण चिरडे यांच्या घरावरील टीनपत्रे उडाली. टिनपत्र्यावरील दगड घरात कोसळले. मात्र सुर्दैवाने कुणालाही इजा झाली नाही. जुना बैलबाजार परिसरातील रमेश ठाकूर यांचे टीनपत्र्याचे घर पूर्णत: झोपले. यासह तालुक्यातील विठोली, कांदळी, तुपटाकळी, वरंदळी, लिंबा आदी भागात प्रचंड नुकसान झाले.
बाभूळगाव तालुक्यात सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा यावली, आलेगाव, पहूर, दाभा, आसेगाव, गळव्ही, चिखली आदी गावांना बसला. या गावातील अनेकांच्या घरावरून टीनपत्रे उडून गेली. बाभूळगाव येथील जिनिंगमध्ये असलेला कापूस पावसामुळे ओला झाला. सरूळ परिसरातील केळी, संत्रा आणि गहू पिकाला पावसाचा फटका बसला आहे. दाभा येथील ९५ टक्के घरावरील टीनपत्रे उडाली. २०० वर्ष जुना वृक्ष मातामायच्या मंदिरावर कोसळल्याने मंदिर उद्ध्वस्त झाले. दाभा येथे १५ मिनिट वादळी पाऊस आणि गारांचा वर्षाव सुरू होता.
नेर तालुक्यातील सोनखासला वादळाचा चांगलाच तडाखा बसला. सोनखास येथील ५० घरावरील टीनपत्रे उडून गेली. पुरुषोत्तम पारधी यांच्या घरावर वृक्ष कोसळल्याने मोठे नुकसान झाले. तसेच यवतमाळ-अमरावती राज्य मार्गावर मोठमोठ्ठाले वृक्ष कोसळून पडल्याने अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती. दारव्हा तालुक्यालाही वादळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. ४ वाजताच्या सुमारास एक तास पाऊस कोसळला.
घाटंजी तालुक्यात दुपारी ६ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या वादळी पावसाने वृक्ष विजेच्या तारावर कोसळले. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. (लोकमत चमू)