पुसद विभागातील अनेक हॉटमिक्स प्लॅन्ट बंदच

By admin | Published: September 16, 2015 03:10 AM2015-09-16T03:10:59+5:302015-09-16T03:10:59+5:30

पुसद महसूल विभागातील चार तालुक्यात थाटण्यात आलेल्या हॉटमिक्स प्लॅन्टपैकी बहुतांश बंदच असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

Many Hotmix Plant Offices in Pusad Division | पुसद विभागातील अनेक हॉटमिक्स प्लॅन्ट बंदच

पुसद विभागातील अनेक हॉटमिक्स प्लॅन्ट बंदच

Next

पुसद : पुसद महसूल विभागातील चार तालुक्यात थाटण्यात आलेल्या हॉटमिक्स प्लॅन्टपैकी बहुतांश बंदच असल्याची माहिती उघडकीस आली आहे. हे प्लॅन्ट बंद असले तरी ते चालू असल्याचे दाखवून कंत्राटदार दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कामे मिळवीत आहे. त्यांच्या कामातील ‘मार्जीन’चे वाटेकरी असल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंतेही याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानताना दिसतात.
पुसद विभागांतर्गत महागाव, उमरखेड, दिग्रस व पुसद या चार तालुक्यांचा समावेश होतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने पुसद विभागासाठी खुशालराव पाडेवार हे कार्यकारी अभियंता नेमले आहेत. त्यांच्या अधिनस्त अनेक उपअभियंते, कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. मात्र या बहुतांश अभियंत्यांची कंत्राटदारांशी असलेली मिलीभगत शासनाच्या तिजोरीला चुना लावण्यासाठी आणि बांधकामांची गुणवत्ता धोक्यात आणण्यासाठी पूरक ठरत आहे. पुसद विभागात १२ हॉटमिक्स प्लॅन्ट असल्याचे बांधकाम खात्याच्या रेकॉर्डवर आहेत. यापैकी केवळ दोन प्लॅन्ट प्रत्यक्ष सुरू आहेत.
त्यांच्याकडेही स्प्रिंकलर, व्हायब्रेटर रोलर, सेन्सर पेवर, १६ ब्रास क्षमतेचा दहा टायरचा टिप्पर, अत्याधुनिक संगणकीकृत कक्ष नाही. अनेक प्लॅन्टकडे तर केवळ बॉयलरच आहे. बहुतांश प्लॅन्ट बंद असले तरी ते सुरू असल्याचे कागदोपत्री दाखवून संबंधित कंत्राटदार सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांचे कंत्राट मिळवितात. याबाबत अभियंत्यांना संपूर्ण माहिती असते. मात्र कमिशनच्या लालसेपोटी ते गप्प राहणे पसंत करतात. वास्तविक त्यांनी प्रत्यक्ष साईटवर जाऊन प्लॅन्टची स्थिती पाहणे गरजेचे आहे. आज अनेक प्लॅन्टवर मोठमोठी झुडूपे वाढली आहे. गेल्या कित्येक वर्षात हे प्लॅन्ट सुरू झाल्याची कोणतीही निशाणी तेथे नाही.
विशेष असे या प्लॅन्टला अमरावती येथे यांत्रिकी कार्यकारी अभियंत्याकडून दरवर्षी ‘ते सुरू असल्याबाबत’ प्रमाणपत्र जारी केले जाते. प्रत्यक्ष प्लॅन्टची अवस्था पाहता हे प्रमाणपत्र कशापद्धतीने जारी केले जात असावे, याची सहज कल्पना येते. अर्थात प्लॅन्ट सुरू असल्याचे दाखवून वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची कामे घेणाऱ्या कंत्राटदारांचे या यांत्रिकी विभागाशीही सलोख्याचे संबंध आहे.
रस्त्याच्या डांबरीकरणासाठी संबंधित कंत्राटदाराकडे हॉटमिक्स प्लॅन्ट बंधनकारक आहे. तो कामाच्या ठिकाणापासून ६० किलोमीटरच्या आत असावा, अशी अट आहे. त्या दृष्टीने पुसद विभागातील अनेक कंत्राटदारांनी आपले प्लॅन्ट थाटले. काहींनी ते सेकंड हॅन्ड विकत घेतले. मात्र अनेक प्लॅन्ट वर्षभरही चालले नाहीत. कागदावर प्लॅन्ट सुरू दाखवून प्रत्यक्ष रस्ता कामात दुसऱ्याच प्लॅन्टवरून डांबर आणून वापरले जाते. नियमानुसार हे डांबर तेवढे गरम राहत नाही. पर्यायाने अवघ्या काही दिवसातच डांबरी रस्ता उखडला जातो. कारण रस्त्याच्या ठिकाणी येईपर्यंत हे डांबर थंड होते.
कारपेट-सिलकोटच्या डांबरात दोन टक्के ‘मार्जिन’
रस्ता बांधताना त्यात किती टक्के डांबर वापरावे याचे बंधन घालून दिले जाते. मात्र प्रत्यक्षात ते पाळले जात नाही. त्यानंतरही गुणवत्ता नियंत्रण विभाग या कामाचा दर्जा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र जारी करते. कारपेटसाठी साडेतीन टक्के तर सिलकोटसाठी साडेसात टक्के डांबर वापरणे गरजेचे आहे. परंतु प्रत्यक्षात अनुक्रमे दोन टक्के व सहा टक्के डांबर या कामावर वापरले जाते. त्यानंतर पहिल्याच पावसात हा रस्ता उखडतो. हेच कंत्राटदार व अभियंते संगनमताने या रस्त्याला पूरहानीच्या यादीत दाखवून पुन्हा त्यावर दुरुस्ती-पॅचेसच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करतात. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व हॉटमिक्स प्लॅन्टची प्रामाणिकपणे तपासणी झाल्यास अर्धे अधिक प्लॅन्ट गेल्या कित्येक वर्षांपासून पेटलेच नसल्याचे आढळून येईल. तर कार्यरत असलेल्या अनेक प्लॅन्टची उपकरणे कालबाह्य झाल्याचे सिद्ध होईल, एवढे निश्चित. या प्लॅन्टला दरवर्षी वातानुकूलित कक्षात बसून बोगस सर्टिफिकेट जारी करणाऱ्या अमरावती येथील कार्यकारी अभियंता आर.एस. चव्हाण यांच्याही कारभाराची मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे यांनी चौकशी करण्याची मागणी बांधकाम यंत्रणेतूनच पुढे आली आहे. दरम्यान यवतमाळचे अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के यांनी पुसद विभागातील प्लॅन्टबाबत तक्रार प्राप्त झाली असून त्याची चौकशी केली जाणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Many Hotmix Plant Offices in Pusad Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.