सावळी सदोबा पीएचसीत अनेद पदे रिक्तच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:38 AM2021-04-19T04:38:51+5:302021-04-19T04:38:51+5:30
सध्या कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टरांचे पद रिक्त आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना खासगी दवाखान्याकडे ...
सध्या कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टरांचे पद रिक्त आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना खासगी दवाखान्याकडे जावे लागत आहे. यात नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, येथे प्रत्येकी एक एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून एमबीबीएस डॉक्टरांचे पद रिक्त आहे.
बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदाची परवड सुरू आहे. येथे रोज २०० ते ३०० बाह्यरुग्ण येतात, सोबत आंतररुग्णदेखील असतात. त्या तुलनेत येथे कर्मचारी नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यावरील ताण वाढला आहे. त्याचा त्रास रुग्णांना होत आहे. आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत ३२ गावांचा समावेश आहे. आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी बैठका, सभा घेतल्या जातात. सर्वेक्षण, रिपोर्टिंग, कार्यालयीन रेकॉर्ड, कुटुंब नियोजन यांसारखे विविध कार्यक्रम राबविले जातात. मात्र, आरोग्य केंद्रात पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे.
बॉक्स
अधिकारी, कर्मचाऱ्यांवर रोष
अनेक वर्षांपासून येथील वैद्यकीय अधिकारी, कंत्राटी आरोग्य सेविका, महिला पर्यवेक्षक, परिचर, आरोग्य सेविकेचे पद रिक्त आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. कार्यरत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रिक्त पदांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. बरेचदा रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.