दुधात अनेक पदार्थांची भेसळ
By admin | Published: July 24, 2016 12:50 AM2016-07-24T00:50:18+5:302016-07-24T00:50:18+5:30
जिल्ह्यात शेतीसोबत दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात. शेतकरी हे दूध खासगी दूध संकलन केंद्राकडे नेतात.
बालके संकटात : आरोग्यावर विपरित परिणाम
दिग्रस : जिल्ह्यात शेतीसोबत दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात. शेतकरी हे दूध खासगी दूध संकलन केंद्राकडे नेतात. तेथे त्यात अनेक पदार्थांचे भेसळ करून ते विकले जात आहे. परिणामी बालकांना हे भेसळयुक्त दूध पाजल्यानंतर त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागातून साधारणत: ४० ते ५० गावांचे दूध विक्रेते आपले दूध येथील संकलन केंद्रावर आणून त्याची विक्री करतात. त्या दुधावर कोणत्याही प्रकारे पाश्चराईझेशन केले जात नाही किंवा त्याची शुद्धतासुद्धा तपासली जात नाही. कमी भावात हे दूध मिळत असल्याने खरेदीदार त्याची कोणतीही तपासणी करीत नाही. तेच दूध विकत घेऊन, ते त्या दुधाची अव्वाच्या सव्वा दरात किरकोळ बाजारात विक्री करतात. विशेष म्हणजे दूध संकलन केंद्र तालुक्यातून येणाऱ्या दुधात अशुद्ध पाणी टाकून ते दूध विकत असल्याने, त्या दुधातील सत्वता व स्निग्धता पूर्णत: कमी होते. हेच दूध लहान मुलांना पिण्यास दिले जात असल्याने त्यांना टायफाईड, जुलाब, उलट्या, काविळ, जंत, आतड्याचा विकार, आदी आजार बळावतात. त्यामुळे बालकांसह मोठ्यांनाही विविध आजार होत आहे.
दैनंदिन जीवनात दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बालकांचे आयुष्य तर पूर्णत: दुधावरच अवलंबून आहे. मात्र त्याच दुधात भेसळ होत असून त्यांना आपण विषच पाजत तर नाही ना, असा प्रश्न पालकांना पडला आहे. यामुळे बालकांचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या या दुधात आधीच पाणी टाकले जाते. त्यात दूध संकलन केंद्रात पुन्हा हेराफेरी केली जाते. या दुधाला पांढरा रंग येण्यासाठी पिठासारखे पदार्थ त्यात मिसळविले जातात. ते ग्राहकांच्या लक्षातसुद्धा येत नाही. यातून ग्राहकांची आर्थिक लूट तर होतेच, सोबतच त्यांना अशुद्ध दूध मिळते. दूध संकलन विक्रेत्याच्या मनमानी कारभार रामभरोसे असतो. खासगी दूध संकलन केंद्र ठेकेदारी पद्धतीने कारभार करतात. पूर्वी गावोगावी शासकीय दूध संकलन केंद्र होते. मात्र गावातील म्हैस, गायी व इतर सस्तन प्राणी कमी झाल्याने आता तालुक्याला दूध विक्री केली जाते. मात्र दूध संकलन केंद्राची पत घसरली असून ग्राहकांना आता शुद्ध दूध मिळणे अवघड झाले आहे. घरोघरी दुधाची गंगा वाहणाऱ्या दिग्रस तालुक्याची ख्याती, आता नामशेष होत आहे. (शहर प्रतिनिधी)
विठोली येथील गुरेढोरे विक्रीला
दिग्रस तालुक्यातील विठोली मारोती येथील गावात पूर्वी विक्रमी दूध उत्पादन होत होते. यवतमाळ जिल्ह्यात हे गाव दूध उत्पादनात अग्रस्थानी होते. मात्र सततचा दुष्काळ अन् नापिकीने तेथील शेतकरी आता हतबल झाले आहेत. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेली गुरेढोरे आता विक्रीला काढली आहे. परिणामी या गावातील शेतीपूरक व्यवसाय मोडकळीस आला आहे. शेतकऱ्यांना आता कोणता व्यवसाय करावा, असा प्रश्न पडला आहे. ही समस्या केवळ तालुक्यातील एकाच गावाची नसून संपूर्ण जिल्ह्यालाच ती भेडसावत आहे.