दारव्हा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:09 PM2019-06-13T22:09:14+5:302019-06-13T22:09:48+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ४ व ६ जून रोजी प्रचंड वादळ झाले. यात मोठे नुकसान झाले असून विजेचे खांब तुटून पडले आहेत. त्यामुळे मागील दहा दिवसांपासून अनेक गावातील वीज पुरवठा पूर्णत: बंद आहे. सलग दहा दिवसांपासून वीज नसल्याने या गावातील जनजीवन विस्कळीत झाले असून दैनंदिन कामकाज ठप्प पडले आहे.
दोन दिवसांच्या फरकाने आलेल्या वादळी वाऱ्यामुळे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. वीज पुरवठा सुरळीत करताना वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. वीज वितरणकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. शिवाय आवश्यक ते साहित्यही वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरुस्तीचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. सायखेडा, तळेगाव, लोही या फिडरवर असलेल्या गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वीज नसल्याने प्रचंड उकाड्यात दिवस व रात्र काढावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना मुबलक पाणी असूनही मान्सूनपूर्व पिकांची लागवड करता आली नाही. एकाचवेळी अनेक गावात बिघाड झाल्याने स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचा संयम ढळत आहे. एकंदरच स्फोटक परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. प्रचंड उकाडा होत असताना वीज पुरवठा नसल्याने लहान मुले व वृद्धांना आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवल्या आहेत. लवकर पुरवठा सुरू करण्याची मागणी आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची वीज महावितरण कार्यालयावर धडक
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा तत्काळ सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तळेगाव फिडरमधील गावांचा वीज पुरवठा सुरू केला जाईल, असे आश्वासन वितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते श्रीधर मोहोड, तालुका प्रमुख मनोज सिंगी, पंचायत समिती सदस्य नामदेव जाधव, सिंधू राठोड, राजू दुधे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख प्रवीण पवार, वहीद खान, रामेश्वर गिरी, बळीराम जाधव, प्रेमसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.