वणी तालुक्यात अनेक गावांना विषाणूचा डंख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:55 AM2017-09-27T00:55:16+5:302017-09-27T00:55:33+5:30
विषाणूंसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने वणी तालुक्यातील अनेक गावे तापाने फणफणत आहेत. वणी शहरासह तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ पसरली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : विषाणूंसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने वणी तालुक्यातील अनेक गावे तापाने फणफणत आहेत. वणी शहरासह तालुक्यातील अनेक गावांत तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी वणी शहरातील खासगी दवाखान्यांसह ग्रामीण रुग्णालयातही रुग्णांची दररोज उपचारासाठी गर्दी होत आहे.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तापमानात कमालिची वाढ झाली आहे. मध्यरात्रीनंतर मात्र हलकी थंडी पडू लागली आहे. दिवसा तिव्र उन्हं आणि रात्री थंडी, अशा विचित्र वातावरणाने विषाणूजन्य आजाराने डोके वर काढले आहे. परिणामी तालुक्यातील अनेक गावे तापाने फणफणत आहेत. राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाºया नवेगाव, विरकुंड या गावामध्ये तापाचे रुग्ण वाढत असल्याची बाब लक्षात येताच, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास कांबळे यांच्या सूचनेवरून डॉक्टरांच्या एका पथकाने गावात जाऊन रुग्णांवर उपचार केले, तसेच अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना राजूर कॉलरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काहींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वणी शहरातही विषाणूजन्य आजाराची साथ पसरली आहे. घराघरांत तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही तापाच्या रुग्णांची तुडूंब गर्दी दिसून येते.
वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दररोज २५० पेक्षा अधिक तापाचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती रुग्णालयीन सूत्रांनी दिली. या रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांच्या संख्येमुळे कार्यरत कर्मचाºयांवरील कामाचा ताण चांगलाच वाढला आहे.
स्वाईन फ्ल्यूचे आठ संशयित रूग्ण आढळले
गेल्या महिनाभरात वणी परिसरात स्वाईन फ्ल्यू या आजाराची लक्षणे असलेले जवळपास आठ रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. यांपैैकी काही रुग्णांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली, तर ज्यांची प्रकृती गंभीर होती, त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी वणी शहरातील एका महिलेच्या आजारात स्वाईन फ्ल्यूची लक्षणे आढळून आल्याने तिला तातडीने नागपूर येथील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. भालर येथील एका महिलेलादेखील स्वाईन फ्ल्यू झाल्याच्या शंकेवरून नागपूर येथे रवाना करण्यात आले.
तालुक्यातील अनेक गावांत विषाणूजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यादृष्टीने आरोग्य विभागातर्फे उपचाराच्या उपाययोजना करण्यात येत आहे. औषध साठाही मुबलक आहे.
डॉ.विकास कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, वणी