मार्लेगावच्या शेतकऱ्याची नांदेड येथे मृत्युशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:00 PM2018-05-07T22:00:39+5:302018-05-07T22:00:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : कर्जबाजारीपणामुळे स्वत:च्या घरासमोर अंगावर रॉकेल ओतून जाळून घेणाºया तालुक्यातील मार्लेगाव येथील शेतकऱ्याची नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. दोन दिवसांपासून ते आॅक्सीजनवर असून प्रकृती मात्र कोणतीही सुधारणा झाली नाही.
श्यामराव रामा भोपळे (६०) रा. मार्लेगाव असे शेतकऱ्याचे नाव असून रविवारी पहाटे ३ वाजता त्यांनी जाळून घेतले होते. ९० टक्के जळालेल्या अवस्थेत त्यांना नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. श्यामराव भोपळे यांच्याकडे जिल्हा बँकेचे १७ हजार ७०० रुपये थकीत कर्ज असल्याची माहिती आहे. याच कर्जापायी त्यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. कर्ज आणि हरभरा, तूर व कपाशीला योग्य भाव न भेटल्यामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान सावळेश्वर येथील शेतकरी आत्महत्येपाठोपाठ मार्लेगाव येथील शेतकऱ्यानेही जाळून घेतले. या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच याची गंभीर दखल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. आपल्या टिष्ट्वटर अकाऊंटवर त्यांनी या प्रकाराबाबत शासनाचा कडाडून समाचार घेतला.