यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब
By सुरेंद्र राऊत | Published: February 1, 2024 05:39 PM2024-02-01T17:39:59+5:302024-02-01T17:40:32+5:30
मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे.
यवतमाळ : जिल्ह्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचा शुक्रवार २ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख ९६ हजार ४९३ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्ह्यात २३ जानेवारीपासून सुरु झालेल्या सर्वेक्षणासाठी ३ हजार २९५ प्रगणकांची नेमणूक करण्यात आली आहे. १ हजार ९३९ गावांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरु झाले आहे. प्रगणक घरोघरो भेटी देवून सर्वेक्षणातील माहिती घेत आहेत. यापैकी ३१ जानेवारीपर्यंत १ हजार २३८ गावांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. प्रति प्रगणक सर्वेक्षण झालेल्या कुटुंबाची संख्या १५१ आहे. उर्वरित गावांचे सर्वेक्षण मुदतीत पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यात मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे. पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने समिती गठित करण्यात आली आहे. याच अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी सर्वेक्षण कामात सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.