नागरिकांचा रोष, वरोडी येथे आमदार नामदेव ससाणे यांचा ताफा अडविला
By विशाल सोनटक्के | Published: October 30, 2023 02:09 PM2023-10-30T14:09:25+5:302023-10-30T14:10:40+5:30
शासन आपल्या दारी : महागाव पुसद उमरखेडच्या एसटी बसेस रिकाम्या धावल्या
महागाव (यवतमाळ) : मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र झाले आहे. याची झळ यवतमाळ येथे होत असलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमालाही बसली आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहू नका अशा आशयाचे बॅनर समाज माध्यमावर व्हायरल झाली असून, या कार्यक्रमाला निघालेला भाजप आमदार नामदेव ससाणे यांचा ताफाही कार्यकर्त्यांनी अडविला. त्यामुळे ससाने यांना परतावे लागले. दरम्यान आंदोलनामुळे महागाव, पुसद, उमरखेड तालुक्यात पाठविलेल्या शासन आपल्या दारीसाठीच्या बस रिकाम्या परतू लागल्या आहेत.
महागाव तहसील कार्यालयाला २५ एसटी बसेस मधून लाभार्थी नेण्याचे टारगेट देण्यात आले होते. विविध योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्र देण्यासाठी सर्व योजनांचे मिळून साधारण १००० प्रमाणपत्र महागाव तहसील कार्यालयाने तयार करून ठेवले आहे. तीच गत पुसद उमरखेड तालुक्याची आहे. लाभार्थ्यांना नेण्यासाठी महागाव तहसील कार्यालयावर सकाळी सहा वाजता एसटी बस आल्या होत्या परंतु येथील वातावरण पाहता त्या न थांबता सरळ यवतमाळ मार्गे निघून गेल्या. स्थानिक प्रशासनाचे नियोजन ढासळल्यामुळे त्याचा फटका लाभार्थ्यांना तर बसलाच परंतु कर्मचाऱ्यांना सुद्धा बसला त्यांना खासगी वाहनाने यवतमाळ किन्ही येथे कार्यक्रम स्थळी कसेबसे पोहोचावे लागले.
सकल मराठा समाज बांधवांनी आव्हान केल्यानुसार सकाळी सात वाजता पासूनच महागाव शहरातील उटी फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तब्बल चार तास हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर या रस्त्यावरची वाहतूक सुरळीत झाली.
सोमवारी सकाळी आठ वाजता आमदार नामदेव ससाने हे आपल्या खाजगी पीएला घेण्यासाठी फुलसावंगी मार्गे यवतमाळ कडे जात असताना वरोडी येथेच सकल मराठा समाज बांधवांनी त्यांचा ताफा अडवला. आपणही या कार्यक्रमाला जाऊ नये अशी नागरिकांनी त्यांना विनंती केली नागरिकांचा रोष पाहू आमदार माघारी फिरले.