यवतमाळात मुख्यमंत्री शिंदेंच्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मराठा आंदोलकांचा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 05:02 PM2023-10-30T17:02:21+5:302023-10-30T17:40:48+5:30
मराठा आंदोलनाची झळ यवतमाळातील शासन आपल्या दारी कार्यक्रमाला
यवतमाळ : येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय राष्ट्रीय महामार्गालगत किन्ही येथे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडतोय. दरम्यान, कार्यक्रम सुरु असताना बाहेर गोंधळ घातला. यामुळे एकच खळबळ उडाली.
सध्या राज्यात मराठा आंदोलन तीव्र झाले असून त्याची झळ यवतमाळ येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमालाही बसत आहे. मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून शासन आपल्या दारी कार्यक्रमस्थळी गोंधळ घालत घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण तापले होते. दरम्यान, पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेत, गाडीमध्ये टाकून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं.
मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण चांगलच तापलं असून यवतामाळातही यवतमाळच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर मराठा आंदोलकांच्या रोषाचे सावट पाहायला मिळाले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या पोस्टरला अज्ञांताकडून काळे फासण्यात आले. सोमवारी सकाळी आठ वाजता आमदार नामदेव ससाने हे आपल्या खासगी पीएला घेण्यासाठी फुलसावंगी मार्गे यवतमाळकडे जात असताना वरोडी येथेच सकल मराठा समाज बांधवांनी त्यांचा ताफा अडवला. आपणही या कार्यक्रमाला जाऊ नये अशी नागरिकांनी त्यांना विनंती केली नागरिकांचा रोष पाहू आमदार माघारी फिरले. तर, बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आंदोलकांनी हल्ला केला. त्यांचे घर आणि गाडी आंदोलकांनी जाळली.