उमरखेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 10:43 PM2018-07-25T22:43:59+5:302018-07-25T22:44:40+5:30

सकल मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चा गायत्री चौकात पोहोचताच दगडफेक झाली. यात दराटीचे ठाणेदार, दोन शिपाई व दोन मोर्चेकरी जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Maratha society brother attacked in Umarkhed | उमरखेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक

उमरखेडमध्ये मराठा समाज बांधव आक्रमक

Next
ठळक मुद्देगायत्री चौकात दगडफेक : दराटी ठाणेदारासह दोन शिपाई, दोन नागरिक जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सकल मराठा समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी बुधवारी मोर्चा काढला. मोर्चा गायत्री चौकात पोहोचताच दगडफेक झाली. यात दराटीचे ठाणेदार, दोन शिपाई व दोन मोर्चेकरी जखमी झाले. पोलिसांनी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सकल मराठा समाजाने विविध मागण्यांसाठी बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. येथील बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा संजय गांधी चौकात (गायत्री चौक) पोहोचल्यानंतर काही प्रतिष्ठानांवर तुरळक दगडफेक झाली. यामुळे धावपळ उडाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दरम्यान, दगडफेकीत दराटीचे ठाणेदार सुभाष उन्हाळे यांचा उजवा हात फ्रॅक्चर झाला. याशिवाय पोलीस शिपाई रावसाहेब मस्के (२८), गजानन मारोतराव देवसरकर (३६) जखमी झाले. तसेच साहेबराव शिंदे (४५) रा.पिंपळगाव वन व डॉ.राजेश जोगदंड (४५) हेसुद्धा जखमी झाले. शिंदे यांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये, तर डॉ.जोगदंड यांनी दगडफेकीमध्ये जखमी झाल्याचे सांगितले.
जमावाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांच्यावरही दगडफेक केली. मात्र हेल्मेट असल्यामुळे ते बचावले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात पोहोचला. तेथे वकील संघटनेचे सदस्य मोर्चात सहभागी झाले. त्यांनी तेथेच कोट पेटवून शासनाचा निषेध केला. मोर्चामुळे शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. छत्रपती शिवाजी चौकात काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिंदे यांच्या कुटुंबाला ५० लाखांची मदत द्यावी, शिंदे यांना शहीदाचा दर्जा द्यावा, त्यांच्या मृत्यूस जबाबदार मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. नंतर हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. तेथेही ठिय्या आंदोलन करण्यात आले.
उपविभागीय अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात तालुक्यातील अनेक गावांतील समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चामध्ये गजानन कदम, राम देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, चक्रधर देवसरकर, शिवाजी माने, अ‍ॅड.संजीव जाधव, बळीराम मुटकुळे, शिवाजी वानखेडे, जितेंद्र पवार, गौरव चंद्रवंशी, राजेश पाटील, गुणवंत सूर्यवंशी, युवराज देवसरकर, चिंतागराव कदम, भीमराव चंद्रवंशी, दत्तराव शिंदे, रमेश चव्हाण, उत्तमराव वानखेडे, डॉ.आनंद कदम, रामदास कदम, बालाजी वानखेडे, किशोर भवरे, सचिन घाडगे, अमोल पंतिगराव, डॉ.वंदना कदम, अरविंद धबडगे, आशा देवसरकर, सरोज देशमुख, सुरेखा माकोडे, नंदा तावडे, सुरेखा जाधव यांच्यासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्यानंतर भावना सूर्यवंशी, स्नेहल मोरे आणि शिवानी घाडगे या मुलींनी सभेला संबोधित केले.
पोलिसांनी मोर्चा नियंत्रणात ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व महिला व पुरुष पोलीस पाटलांना मदतीस पाचारण केले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. २८ पोलीस अधिकारी, १५५ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. दराटी, बिटरगाव, वणी, पांढरकवडा, लाडखेड आणि यवतमाळ येथील पोलीस मुख्यालयातून जादा कुमक मागविण्यात आली होती. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव उमरखेडमध्ये तळ ठोकून बसले आहेत.
विडूळमध्ये दोन एसटी बसच्या काचा फोडल्या
विडूळ येथून उमरखेडकडे जाणाऱ्या दोन बसच्या काचा जमावाने फोडल्या. यात बसमधील मंदाताई पंडित कनवाळे (४०), ओमकार पंडित कनवाळे (१५), महेंद्रसिंग राहुपाल रोकडे आणि वच्छला पांडुरंग निखाते दगड व काचा लागून जखमी झाले. त्यांना विडूळ प्राथमिक केंद्रात व नंतर उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. कोप्रा-बोरी-उमरखेड (क्र.एम.एच.४० /८७४९) या बसवर काहींनी दगडफेक करून तोडफोड केली. तसेच एका शेताजवळ दुसऱ्या बसवर (क्रएम.एच.४०/८०७०) दगडफेक केली. या दोन्ही बस उमरखेड आगाराच्या होत्या. बस चालक व्ही.डी. गोडे, वाहक सदानंद फाळके यांनी बसमध्ये २५ प्रवासी असल्याचे सांगितले. जखमींना पंचायत समिती सदस्य बाळू आगलावे, रणजित रणमले, विशाल कोतेवार, महेश करकले, विनोद रणमले, अनिल कांबळे यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यास सहकार्य केले. पीएसआय सिंगलवाड, जमादार मनोहर जाधव, सुनील काळोसे यांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली.
माजी आमदारांना धक्काबुक्की
मोर्चात सहभागी होण्यास आलेले शिवसेना नेते तथा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांना मोर्चेकऱ्यांकडून धक्काबुक्की झाली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर देवसरकर यांनी काढता पाय घेतल्याने मोर्चा मार्गस्थ झाला. दरम्यान, उमरखेड ठाण्यातील पोलीस शिपाई विलास शेळके यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तत्काळ उपचारार्थ नांदेडला हलविले.
वकीलही आंदोलनात
उमरखेड येथील वकील संघटनेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी न्यायालय परिसरातून मोर्चा काढला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात मुख्य मोर्चात सहभागी झाला. तेथे ठिय्या आंदोलन करून काही वकिलांनी कोट जाळून शासनाचा निषेध केल्ाां. बुधवार हा आठवडीबाजाराचा दिवस असल्याने ग्राहकांची तारांबळ उडाली होती.

Web Title: Maratha society brother attacked in Umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.