मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

By अविनाश साबापुरे | Published: December 7, 2023 05:44 PM2023-12-07T17:44:02+5:302023-12-07T17:45:13+5:30

उमरखेडच्या जाहीर सभेला लाखोंचा जनसमुदाय

Marathas keep united, reservation is bound to happen says Manoj Jarange Patil | मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

मराठ्यांनो एकजूट ठेवा, आरक्षण मिळणारच: मनोज जरांगे पाटील

उमरखेड (यवतमाळ) : मराठा समाजाला ७० वर्षात सिस्टीमने घेरुन नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाची नोंद असतानाही आरक्षण दिले नाही. आता गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू झाल्यानंतर ३५ लाख मराठा बांधवांच्या नोंदी आढळल्या. त्यामुळे मराठा बांधवांनो एकजूट राहा. आता सरसकट आरक्षण मिळाल्याशिवाय समाज शांत होणार नाही, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

स्थानिक ढाणकी मार्गावरील गो. सी. गावंडे महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवारी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. आपली मुले उच्चशिक्षित होऊन नोकरीवर लागावी, हे प्रत्येक मराठा आईवडिलांचे स्वप्न होते. मात्र मराठ्यांची मुले शेतीभोवती वेदना सांभाळत व्यसनाधीन व्हावी, असेच प्रयत्न आतापर्यंत सरकारकडून होत आले. आता मराठा समाजाची ताकद पाहता २४ डिसेंबर रोजी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेलच, असा आशावाद मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. या लढ्यात राजकारण येऊ देऊ नका.

ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणे लावण्याची काम छगन भुजबळकडून होत आहे. मराठा बांधवांनी कुणाच्याही अंगावर जाऊ नये. आंदोलन शांततेच्या मार्गाने केले तर आंदोलनाची ताकद वाढेल. ७० वर्षानंतर आरक्षण निर्णय प्रक्रियेत आपण आता आलोय. त्यामुळे आंदोलनाला कुठेही गालबोट लागू न देण्याचे आवाहन त्यांनी केले. ७० वर्षांपूर्वीच्या नोंदीप्रमाणे आरक्षण दिले असते तर या देशात प्रगत जात म्हणून मराठा समाज नंबर एकवर असता. आता आरक्षण मिळाल्याशिवाय सरकारला सुट्टी देणार नसल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

छगन भुजबळ यांना सरकारने आवरावे. त्यांचे उभे आयुष्य लोकांच्या मुंडक्यावर पाय ठेवण्यात गेले. त्यांच्यात कुटूनकुटून जातीवाद भरला आहे. दंगली घडविण्याचा भाषा बोलणारा माणूस, महापुरुषांच्या जाती काढणारा माणूस, हा सज्जन असू शकत नाही, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. आपण ओबीसीमधूनच आरक्षण घेणार या भूमिकेवर ठाम असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. या सभेचे आयोजन उमरखेड येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. सभेसाठी लाखो नागरिकांचा जनसमुदाय उसळला होता. 

सभेपूर्वी रोड शो

सभेपूर्वी सकाळी दहा वाजता उमरखेड शहरातून मनोज जरांगे पाटील यांचा रोड शो करण्यात आला. दुपारी साडेबारा वाजता सभा सुरू झाली. सभास्थळी सातशे ते आठशे स्वयंसेवकाकडून पाणी, खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. 

मुस्लीम समाजाकडून स्वागत

उमरखेड शहरातून सभास्थळी जात असताना मनोज पाटील जरांगे यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम युवक उपस्थित होते.

छत्रपती चौकात जेसीपीने केले स्वागत 

मनोज पाटील जरांगे यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आगमन होताच उपस्थितांनी चार जेसीपीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. शहरातून जात असताना जरांगे पाटील यांच्या ताफ्याच्या मागे हजारोच्या संख्येने मराठा बांधव होते.

Web Title: Marathas keep united, reservation is bound to happen says Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.