मराठी भाषा संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 11:27 PM2018-02-27T23:27:53+5:302018-02-27T23:27:53+5:30
मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : मराठी भाषेला दोन-अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. काळानुरुप ती बदलत गेली आहे. आपले आचार, विचार तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी भाषा हे एक महत्वाचे माध्यम आहे. मराठी लोकाभिमुख तसेच ज्ञानभाषा होणे गरजेचे असून, तिच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन तसेच संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा खनिकर्म अधिकारी गोसावी, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. भराडी, माहिती व सूचना केंद्राचे प्रमुख राजेश देवते, संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर, प्रदर्शनाच्या संयोजिका राजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्यामुळे आपल्या मुलांनाही मराठी भाषेतून शिकविण्याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पाल्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून झाले, याचा मला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीने दर्जेदार साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले म्हणाले, भाषा प्रभावीपणे बदलत असते. तसेच चालिरीती आणि परंपरासुध्दा बदलतात. भाषा आणि परंपरा यांचे एक वेगळे नाते आहे. भाषेच्या समृध्दीसाठी अनेकांनी योगदान दिले असून मराठीला आणखी प्रगत करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
मराठीचा गौरव केवळ एका दिवसाकरिता नव्हे तर, नेहमी झाला पाहिजे, असे संस्कार भारतीचे विदर्भ सहमहामंत्री विवेक कवठेकर यांनी सांगितले. यावेळी अंजली सरूरकर, वेदश्री घोरकर यांनी गीत सादर केले.
प्रास्ताविक निवासी उप जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन प्रा. ताराचंद कंठाळे यांनी तर आभार जीवन कडू यांनी मानले.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन
जिल्हा ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह विनोद देशपांडे, सदस्य मनोज रणखांब उपस्थित होते.
फीत कापून ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालयातील विजय मुळै, रवींद्र वानखेडे, लालसा गुल्हाने यांच्यासह ग्रंथालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.