यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी दरोड्याचे मराठवाडा कनेक्शन; दहा आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 02:54 PM2020-09-03T14:54:18+5:302020-09-03T14:58:58+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी दरोड्यातील दहा आरोपींना अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उमरखेड तालुक्याच्या ढाणकी ते खरुस रोडवर २९ ऑगस्ट रोजी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचे मराठवाडा कनेक्शन पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दरोड्यातील दहा आरोपींना अवघ्या चार दिवसात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विश्वनाथ शंकर शिंदे (२२), रा. उमरी जि. नांदेड, शुभम मुकुंद अडकीने रा. पवार कॉलनी भोकर, मनोज उर्फ चंद्रकांत लक्ष्मकांत मनोरवार (३१) रा. कोळगल्ली भोकर, विकास किसन परिमल (३९) रा. ढाणकी, रामचंद्र लक्ष्मण संजेवाड (१८) रा. नंदीनगर शिवाजी चौक भोकर, सुरज गौतम सावते (२१) रा. पवना ता. हिमायतनगर, चंद्रकांत गौतम सावते (२८) रा. पवना, धम्मदीप नारायण राऊत (२१) रा. पवना, अजय शेकू राऊत (२०) रा. पवना आणि नितीन उर्फ एक्का नारायण अडुलवार (२०) रा. रापर्तीवारनगर उमरी ता. हिमायतनगर जि. नांदेड यांचा दरोड्यातील आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांना अटकही करण्यात आली.
त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा टीयूव्ही कार, यामा मोटरसायकल, स्प्लेन्डर, होंडा लिओ मोटरसायकल, चार चाकू, एक तलवार, एक कुशा, सहा मोबाईल व दरोड्यातील सोने असा दहा लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, उमरखेडचे प्रभारी एसडीपीओ बागवान यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर, नियंत्रण कक्षातील सहायक निरीक्षक संदीप चव्हाण, फौजदार निलेश शेळके, श्रीकांत जिंद्दमवार आदींनी अवघ्या चार दिवसात हा गुन्हा उघडकीस आणला.
२९ ऑगस्ट २०२० च्या सायंकाळी जिल्हावार यांच्या शेतातील गोठ्यावर दहा ते १५ जणांनी सशस्त्र दरोडा घातला. शेतातील दोन सालगडी, त्यांची पत्नी व मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. एका सालगड्याला चाकुने मारहाण केली. तर दुसऱ्याला विहिरीत लोटून देऊन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला गेला. सालगड्याच्या पत्नीच्या गळ्यातील २० हजारांचे सोने दरोडेखोरांनी लुटून नेले. या प्रकरणी बिटरगाव पोलिसांनी भादंवि ३९५, ३९७, ३०७, ३२३, ५०६, कलमान्वये गुन्हा नोंदविला. दरोड्याच्या या घटनेमुळे ढाणकी परिसरातील शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. हा गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. एलसीबीने अवघ्या चार दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला. एलसीबीच्या या पथकात गोपाल वास्टर, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, पंकज पातुकर, उल्हास कुरकुटे, मो.ताज, किशोर झेंडेकर, दत्ता दुंम्हारे, गणेश वास्टर, बिटरगावचे एपीआय विजय चव्हाण, फौजदार जायेभाये, पोलीस शिपाई खामकर, गिते, चव्हाण यांचा समावेश होता.
ढाणकीत तीन पेट्या सोने दडवून असल्याची होती टीप
ढाणकी येथील विकास किसन परिमल याने दोन महिन्यांपूर्वी चंद्रकांत गौतम सावते रा. पवना याला ढाणकी ते खरुस रोडवर संजय जिल्हावार यांच्या शेतातील गोठ्यात तीन पेट्या सोने ठेवले असल्याची टीप दिली होती. त्यावरून चंद्रकांतने दोन महिन्यांपासून जिल्हावार यांच्या गोठ्यावर पाळत ठेवली होती. अखेर या शेतात दरोडा टाकण्याची योजना आखली गेली. त्यासाठी पवना, भोकर, उमरी येथून साथीदारांची जुळवाजुळव चंद्रकांतने केली.