मारेगावचे ग्रामीण रूग्णालय आॅक्सिजनवर

By Admin | Published: April 8, 2017 12:16 AM2017-04-08T00:16:55+5:302017-04-08T00:16:55+5:30

येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णालय आॅक्सिजनवर आले असून उपचाराअभावी गरीब जनतेचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

Maregaon Rural Hospital, Oxygen | मारेगावचे ग्रामीण रूग्णालय आॅक्सिजनवर

मारेगावचे ग्रामीण रूग्णालय आॅक्सिजनवर

googlenewsNext

कायमस्वरूपी डॉक्टर नाही : प्रभारावरच कारभार सुरू, रूग्णालयात पाण्याची टंचाई
मारेगाव : येथील ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रूग्णालय आॅक्सिजनवर आले असून उपचाराअभावी गरीब जनतेचे आरोग्यच धोक्यात आले आहे.
तालुक्यात आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या आहे. तालुक्यातील १०५ गावासाठी दोन प्राथमिक आरोग्य केंद्र व एक शहरात ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची कमतरता हा आता नेहमीचाच विषय बनला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तालुक्याला तालुका आरोग्य अधिकारी नाही, प्रभारावर काम निभावले जात आहे. गेल्या दोन वर्षापासून येथील ग्रामीण रूग्णालय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे आणि इतर कारणाने आॅक्सिजनवर आहे. उपचार करण्यासाठी रूग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागते. बरेचदा तर रूग्णालयात उपस्थित कर्मचारीच रूग्णांवर उपचार करतात. सध्या येथील रूग्णालयात एकही कायमस्वरूपी डॉक्टर नाही. वैद्यकीण अधिकाऱ्यांचा प्रभार वणी येथील डॉ.चंद्रशेखर खांबे यांच्याकडे सोपविला आहे. ते वणीसोबतच मारेगाव रूग्णालयाचा कारभार सांभाळतात.
ग्रामीण रूग्णालयात एकही डॉक्टर नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वेगावचे डॉ.सतिश कोडापे व पांढरकवडा येथी डॉ.नैताम यांना प्रतिनियुक्तीवर देण्यात आले. एक डॉक्टर सलग तीन दिवस म्हणजे ७२ तास रूग्णांच्या सेवेत असतो. येथील रूग्णालयात पाणी टंचाई असल्याने एकाही कुलर आजतागायत लागले नाही. खिडक्यांना तावदाणे नसल्याने गरम हवेने रूग्ण होरपळून निघत आहे. पिण्याच्या पाण्याची बिकट स्थिती आहे. नगरपंचायतीचे नळ आले, तरच टाकीत पाणी भरले जाते. नाही तर रूग्ण पाण्यासाठी परिसरात भांडे घेऊन फिरत असतात.
औषधाचा तुटवडाही तर नित्याचीच बाब आहे. रूग्णांच्या उपचारासाठी बाहेरून औषधे आणावी लागतात. रूग्णांच्या तपासणीसाठी असलेले यंत्र जाग्यावरच सडले आहे. त्यामुळे नेमका ताप कशाचा आहे, हे शोधण्यासाठी रूग्णांची रक्त तपासणी बाहेरून करून आणावी लागते. ३० खाटाच्या येथील ग्रामीण रूग्णालयासाठी दोन शौचालय आहे. परंतु शौचालयाची दुरावस्था आणि पाण्याची टंचाई, यामुळे रूग्ण व नातेवाईक परिसरातच आपल्या विधी करतात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अनेक अनेक असुविधा असल्याने डॉक्टर बहुतांश रूग्णांना सरळ रेफर करतात. त्यामुळे रूग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Maregaon Rural Hospital, Oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.