मारेगाव तालुक्याला गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:05 PM2018-02-13T22:05:05+5:302018-02-13T22:05:32+5:30
ऑनलाईन लोकमत
मारेगाव : तालुक्यात सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान अचानक झालेल्या गारपिटीने कुंभा आणि मार्डी महसूल मंडळातील १४ ते १५ गावांना प्रचंड तडाखा बसला.
सोमवारी झालेल्या गारपिटीचा थर मंगळवारी दुपारपर्यंत कायमच होता. यात शेकडो हेक्टर रबीची पिके उद्ध्वस्त झाली. यात प्रामुख्याने मार्डी मंडळातील सर्वाधिक नुकसान शिवणी (धोबे) या गावातील झाले आहे. या गावातील सर्वच शेतकऱ्यांची रबीची पिके नष्ट झाली. गहू, चना, ज्वारी उर्वरित कापूससुद्धा भूईसपाट झाला. झाडांना पाने राहिली नाही. पक्षी मरून पडले. भाऊराव बदखल यांची गाय गारपीटीच्या माराने गतप्राण झाली. त्याखालोखाल लगचती पार्डी, चनोडा, गाडेगाव, केगाव, चोपण, मजरा, गावालासुद्धा तडाखा बसला. चनोडा येथील भाऊराव चायकाटे यांचा दोन वर्षाचा गोऱ्हा मरण पावला.
कुंभा महसूल मंडळात गारपीटींचा सर्वाधिक तडाखा टाकळी गावाला बसला. शेतकऱ्यांचा चना, गहू, कापूस नेस्तनाभूत झाला. घरावरील कवेलू फुटले, नाल्याशेजारी असणाऱ्या वडाचे पुरातन झाडाला गारपीटीने पानसुद्धा ठेवले नाही. त्याखालोखाल कुंभा, महादापेठ, मांगली, कोथुर्ला, रामेश्वर, खैरगाव बुटी, चिंचमंडळ, दापोरा गावालाही झोडपून काढले. अचानक झालेल्या गारपीटीने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तहसीलदार विजय साळवे, नायब तहसीलदार गोहोकार यांनी गारपीटग्रस्त सर्व गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करून मंडळ अधिकारी, तलाठ्यांना गारपीटग्रस्त नुकसानीचे तत्काळ पंचनामा करण्याचे सूचित केले.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी गारपीटग्रस्त गावांना भेटी देऊन गारपीट नुकसानीचे पंचनामे करण्याच्या तहसीलदारांना सूचना केल्या. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रूपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली.
नुकसान भरपाई न दिल्यास शिवसेना करणार आंदोलन
माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी मंगळवारी तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतांची पाहणी केली. बोंडअळी व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ हेक्टरी २० हजार रूपयांची मदत जाहीर करावी, अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विश्वास नांदेकर यांनी दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत मारेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय आवारी उपस्थित होते.