यवतमाळात पाच दिवस बाजारपेठ बंद; जनता कर्फ्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 08:29 AM2020-09-15T08:29:51+5:302020-09-15T08:30:09+5:30
कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना संसर्गाची वाढती साखळी ब्रेक करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इन्ड्रस्टीजने मंगळवार १५ सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस जिल्ह्यात बाजारपेठ बंदचे आवाहन केले. मात्र हा बंद सक्तीचा नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले.
चेंबर ऑफ कॉमर्सने बंदचे आवाहन केले आहे. परंतु हा जनता कर्फ्यू नाही आणि शासन, प्रशासनाचा याला कुठलाही पाठिंबा, सक्ती नसल्याचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
बहुतांश व्यापारी, व्यावसायिकांचा या बंदला विरोध आहे. विविध सामाजिक संस्थांनीही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा बंद कशासाठी, त्याचे फलित काय असे प्रश्न उपस्थित केले. सर्व काही सुरू असताना केवळ व्यापारपेठ बंद ठेवून कोरोना साखळी तुटेल काय असा सवालही उपस्थित केला गेला. चेंबर ऑफ कॉमर्स आपल्या बंदच्या निर्णयावर ठाम आहे. चेंबरच्या अंतर्गत ५५ ते ६० विविध संघटना आहेत. संघटनात्मक स्तरावर बंदला होकार मिळाला असला तरी अनेक व्यापारी, व्यावसायिकांचा विरोध आहे. त्यामुळे बंद किती यशस्वी होतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.