बाजार समितीचे गतवैभव नष्ट
By Admin | Published: June 5, 2014 12:03 AM2014-06-05T00:03:49+5:302014-06-05T00:03:49+5:30
येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही.
नीलेश यमसनवार - पाटणबोरी
येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही.
यापूर्वी येथील बाजार समिती परिसरात प्रसिध्द होती. येथे परिसरातील शेतकरी बांधव मोठय़ा प्राणामात आपला शेतमाल विक्रीसाठी आणायचे. मोठय़ा प्रमाणात या बाजार समितीत तूर, ज्वारी, चना विक्रीसाठी यायचा. त्यामुळे बाजार समिती गजबजून राहायची. बाजार समितीच्या प्रांगणात बैलंडी, वाहनांची गर्दी दिसायची. परिणामी रात्री दोन वाजतापर्यंत काटा सुरू राहायचा. मात्र आता येथील काही हमालांच्या लुटीमुळे आणि काही व्यापार्यांच्या चुकीच्या धोरणामुळे, बाजार समितीचे गतवैभव नष्ट होत आहे.
येथील व्यापार्यांनी आता शेतकर्यांचा विश्वासच गमविला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता आपला शेतमाल पाटणबोरी येथे न आणता हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद येथे तो विक्रीस नेत आहेत. बाजार समितीचे अनेक गोदामही संरक्षणाअभावी पडीत आहे. त्यांना संरक्षण नसल्याने तूर व चना खरेदीधारक गोदामात माल ठेवत नाही. बाजार समितीचे गोदाम गावाबाहेर असल्याने नेहमी तेथे चोर्याही होतात. त्यामुळे हे गोदाम असुरक्षित झाले आहे. तेथे व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही आपला माल ठेवणे कठीण झाले आहे.
बाजार समितीच्या पाण्याच्या मोटारपंपावर कर्मचार्याचे नियंत्रण नाही. त्यामुळे येथील पाण्याचा वापर परिसरातील नागरिक भांडे, कपडे धुणे, दुचाकी, चारचाकी वाहन धुण्याकरिता करीत असतात. उपबाजार समितीचा दूरध्वनी तर नेहमीच बंद असतो. तो कधीच लागत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी माहिती कुणाकडे विचारावयाची, असा प्रश्न पडतो.
उपबाजार समितीच्या परिसरात कुणीही भटकत नसल्याने हा परिसर आता अवैध व्यवसायाचे केंद्रस्थान बनला आहे. व्यापारीही परस्परच खरेदी करीत असल्याने शेतकरी बाजार समितीत येत नाही. त्यासाठी व्यापार्यांनी गावात ठिकठिकाणी आपले खरेदीचे ठिय्ये तयार केले आहे. तेथेच ते शेतमाल खरेदी करतात. त्यामुळे समितीच्या ‘सेस’चे प्रचंड नुकसान होते. बाजार समितीच्या कर्मचार्यांना प्रति गाडी थोडी ‘चिरीमिरी’ देऊन व्यापार्यांनी बाहेरच शेतमाल खरेदीचा अधिकार मिळविल्याने बाजार समिती ओस पडत आहे. व्यापारी परस्पर खरेदी करीत असल्याने शेतकर्यांचा शेतमाल ‘झिरो’मध्येच खरेदी केला जातो. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चे लाखो रूपयांचे नुकसान होते. त्यातून केवळ व्यापारीच गब्बर बनत आहे. शेतकरी मात्र लुटला जात आहे. बळीराजा या सर्व बाबींमुळे हतबल झाला आहे. मात्र त्याला नाईलाजाने सर्व बाबी सहन कराव्या लागत आहे. बाजार समिती व्यवस्थापनाचे व्यापार्यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकरीच भाव व वजन फरकाने नागविला जात असून त्यांची एक प्रकारे ‘लूट’ सुरू आहे.