यवतमाळ जिल्ह्यात १७ पैकी १६ बाजार समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 03:22 PM2019-02-28T15:22:54+5:302019-02-28T15:32:32+5:30
शासकीय नोकरीत कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारला आहे.
यवतमाळ - शासकीय नोकरीत कायम करावे, यासह विविध मागण्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात १७ पैकी १६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. एकूण १९० पैकी १७५ कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या संपातून अंग काढून घेतल्याने तेथील खरेदी-विक्री व्यवहार सुरळीत सुरू आहे. कर्मचारीच संपावर असल्याने जिल्ह्यातील उमरखेड वगळता १६ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार ठप्प झाले आहे. बाजार समितीतील सोयाबीन, तूर, हरभरा, गहू आदी मालाची खरेदी-विक्री व उलाढाल थांबली आहे. मुंबईत बाजार समिती कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हा बेमुदत संप सुरू झाल्याने शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान शासनाच्याविरोधात जायचे नाही, असे स्पष्ट करीत उमरखेड बाजार समितीच्या कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही.