बाजार समितीला अडीच कोटीने बुडविले

By admin | Published: January 10, 2016 03:01 AM2016-01-10T03:01:58+5:302016-01-10T03:01:58+5:30

पुष्पावंती सहकारी साखर कारखान्याचे तत्कालिन अध्यक्ष व संचालक मंडळाने राजकीय अधिकाराचा दुरूपयोग करत पुसद ...

The market committee was submerged by 2.5 crore | बाजार समितीला अडीच कोटीने बुडविले

बाजार समितीला अडीच कोटीने बुडविले

Next

पत्रपरिषदेत आरोप : ‘पुष्पावंती’चे पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी
पुसद : पुष्पावंती सहकारी साखर कारखान्याचे तत्कालिन अध्यक्ष व संचालक मंडळाने राजकीय अधिकाराचा दुरूपयोग करत पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन कोटी ४० लाख रुपयांचे नुकसान केले. चौकशी अधिकाऱ्याने चिरीमिरी घेऊन दोषींची नावे वगळली. प्रकरणी या कारखान्याचे तत्कालिन अध्यक्ष व संचालक मंडळाविरुद्ध दिवाणी व फौजदारी कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते अ‍ॅड़ सचिन नाईक आणि जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तडसे यांनी येथे शनिवारी पत्रपरिषदेत केली.
बाजार समितीच्या लेखा परिक्षणात अनियमितता व गैरप्रकार आढळून आले. जिल्हा उपनिबंधकांनी १० जुलै रोजी आदेश पारित करून विशेष लेखापरीक्षक वर्ग २ (फिरते पथक) एस.एस. बनसोड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. एक महिन्यात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले. ३० नोव्हेंबर रोजी त्यांनी उपजिल्हा निबंधकांकडे अहवाल सादर केला. मात्र आदेशाची अवहेना करून व्यक्तिगत जबाबदाऱ्या निश्चित केल्या नाही.
गैरप्रकार व अनियमितता झाल्याचे मात्र मान्य केले. यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी अधिकाऱ्यांना सात दिवसात व्यक्तिगत जबाबदाऱ्या निश्चित करून स्वयंस्पष्ट अभिप्राय देण्याचे निर्देश दिले. दरम्यान, बनसोड यांनी अहवालातील दोषींची नावे वगळण्यासाठी दोन लाख रुपये लाच स्वीकारल्याचा आरोप करून त्यांना तत्काळ बडतर्फ करून विभागीय चौकशीची मागणी अ‍ॅड़ नाईक व उपाध्यक्ष तडसे यांनी केली. त्या अनुषंगाने उपजिल्हा निबंधकांनी ५ जानेवारी रोजी चौकशी अधिकाऱ्यांना झालेल्या तक्रारीचा खुलासा आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करण्याचे निर्देश दिले.
अहवाल सादर करताना चौकशी अधिकाऱ्याने बऱ्याच बाबी दडपल्याचा आरोप करण्यात आला. पुष्पवंतीच्या तत्कालिन संचालक मंडळाने ठराव घेऊन बाजार समितीकडे १५ लाख रुपये तीन महिन्यांकरिता १८ टक्के व्याजदराने बचत ठेव मिळण्यासाठी विनंती केली होती. या बाजार समितीने त्याच दिवशी ठरवा घेऊन १५ लाख रुपये देण्याचे मान्य केले, यासाठी आवश्यक कारवाई केली. मात्र आवश्यक ते दिशा निर्देश पाळले गेले नाही. कारखान्याने स्वत:चेच नियम आणि अटी निश्चित करून रक्कम स्वीकारली.
कारखान्याच्या पदाधिकारी व संचालकांनी याप्रकारात बाजार समितीचे आजपर्यंत दोन कोटी ४० लाखांपेक्षा अधिक नुकसान केले. ही रक्कम वसूल होणे आवश्यक असताना चौकशी अधिकारी बनसोड यांनी यासंदर्भात कोणतीही जबाबदारी निश्चित केली नाही. वास्तविक या अधिकाऱ्याने कारखान्यावर कावाईची शिफारस करणे आवश्यक
होते. पण त्यांनी या बाबी
टाळल्या.
याप्रकरणी चौकशी अधिकारी, कारखान्याचे पदाधिकारी, संचालक, बाजार समितीचे तत्कालिन प्रशासक व संबंधित दोषींवर करवाई व्हावी, अशी मागणी अ‍ॅड़ नाईक व तडसे यांनी केली. यावेळी जिल्हा काँगे्रसचे सरचिटणीस अभिजीत चिद्दरवार, तालुकाध्यक्ष पुंडलिकराव टारफे, साकीब शाह आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The market committee was submerged by 2.5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.