बाजार समित्यांना केवळ तुरीचे टार्गेट
By admin | Published: May 25, 2017 01:15 AM2017-05-25T01:15:58+5:302017-05-25T01:15:58+5:30
तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे.
वेग वाढविण्याचे निर्देश : शुक्रवारपासून इतर खरेदी बंदच्या हालचाली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तूर खरेदीसाठी केवळ आठ दिवस सध्या बाकी आहेत, असे असले तरी मोठया प्रमाणात तुरीची खरेदी व्हायची आहे. यामुळे शेतकरी नाईलाजास्तव खुल्या बाजारात तूर नेत आहेत. शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी बाजार समितीमध्ये अधिकाधिक तूर खरेदी करणे गरजचे आहे. त्यासाठी बाजार समितीने तूर खरेदी प्रक्रियेचा वेग वाढवून केवळ तूर खरेदीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे बाजार समितीमध्ये शुक्रवारपासून बुधवारपर्यंत केवळ तूर खरेदी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान इतर शेतमालास ब्रेक बसण्याची शक्यता आहे.
जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रतापसिंह यांनी बुधवारी जिल्ह्यातील तूर खरेदीचा आढावा घेतला. या बैठकीत जिल्हा उपनिबंधक, मार्केटींग फेडरेशन अधिकारी, वखार महामंडळाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यासोबतच शेतकरी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले होेते.
यावेळी सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. तूर खरेदी वेगाने करता यावी म्हणून काट्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना दिल्या गेल्या. यासोबतच पावसाचा कुठलाही फटका तुरीला बसू नये म्हणून शेडमध्ये तुरीचे मोजमाप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
यामुळे पुढील आठ दिवस इतर शेतमालांचे मोजमाप करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडणार आहे. या अडचणीवर मात करण्यासाठी बाजार समितीमध्ये इतर शेतमालाचा लीलाव तूर्त बंद राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जितके मोजमाप करता येतील तितकेच टोकन वाटण्याचे निर्देश बाजार समित्यांना देण्यात आले आहे. प्रत्येक टोकनधारकांच्या तुरीचे मोजमाप झालेच पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सर्व सबंधितांना दिल्या.
बाजार समितीमध्ये तुरीच्या सरकारी थप्प्या
ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वाहने मिळने अवघड झाले आहे. तूर घेवून गेलेल्या ट्रकचा नंबरच लागत नाही. त्यामुळे खरेदी झालेल्या तुरीची गंजी शासकीय संकलन केंद्रांवरच लागली आहे. या ठिकणी इतर शेतमाल विक्रीसाठी जागाच शिल्लक नाही. यामुळे नेहमी व्यापारी गंज्यांवर प्रश्न निर्माण करणाऱ्या यंत्रणेवर प्रथमच बाजार समितीच्या शेडमध्ये थप्पी लावण्याच्या प्रश्नात अडकली आहे.
तीन दिवसांचा ‘अल्टीमेटम’
टोकनधारक शेतकऱ्यांना तुरीचा नंबर लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र शेतकरी लग्न अथवा काही कारणाने बाहेरगावी गेल्याचे निरोप येत आहेत. या प्रकरणात तीन दिवसाची प्रतिक्षा करण्यात यावी, यानंतर टोकन रद्द करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिले.