दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:39 PM2017-10-15T22:39:14+5:302017-10-15T22:39:43+5:30
गत आठवडाभरापासून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेली यवतमाळची बाजारपेठ रविवारी दिवाळीच्या खरेदीने अक्षरश: फुलून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गत आठवडाभरापासून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेली यवतमाळची बाजारपेठ रविवारी दिवाळीच्या खरेदीने अक्षरश: फुलून गेली. बाजार ओळीसह दुकानातही पाय ठेवायला जागा नव्हती. नोकरदार आणि चाकरमाण्यांनी बंपर खरेदी केली. तर आठवडीबाजारात ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.
गत काही दिवसांपासून बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. दिवाळीच्या सणासाठी व्यावसायिकांनी आपली दुकाने विविध साहित्यांनी सजवून ठेवली होती. कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल यासह प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी आणले होते. परंतु ग्राहक फिरकता फिरकत नव्हते. मात्र नोकरदारांचा पगार आणि दिवाळी तोंडावर येताच रविवारी यवतमाळच्या बाजारापेठेत चैतन्य आले. मुख्य बाजारपेठेसह विविध रस्त्यांवर खरेदीदार नागरिकांची गर्दी दिसत होती. अनेक जण सहकुटुंब खरेदीचा आनंद घेत होते. इंदिरा गांधी मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती. रस्त्यावरही मोठी गर्दी दिसत होती. मेनलाईनमध्येही रविवारी खरेदीदारांच्या गर्दीचे दृश्य पहावयास मिळाले. साडी, रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासह रांगोळी, फटाके, पणत्या, लक्ष्मीची मूर्ती, प्रसादाचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू होती.
शहराच्या गर्दीसोबतच दिवाळीचा आठवडी बाजाराही चांगलाच फुलला होता. ग्रामीण भागातून आलेले नागरिक दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटत होते.
शेवटच्या दोन दिवसात गर्दी वाढणार
रविवारी बाजारात सर्वाधिक गर्दी नोकरदारांची होती. बोनस आणि वेतन मिळाल्याने नोकरदार बंपर खरेदी करताना दिसत होते. दिवाळीत प्रत्येक जण थोडी थोडकी का होईना खरेदी करतात. त्यामुळे सोमवार, मंगळवार या दोन दिवसात आणखी गर्दी वाढणार आहे. ही गर्दी कॅश करण्यासाठी व्यावसायिकही सज्ज झाले आहे. अनेक व्यावसायिकांनी आकर्षक योजना ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत.