पूसदमधील बाजारपेठ फुलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:37+5:302021-06-03T04:29:37+5:30
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नाही. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मार्चपासून ...
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नाही. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्बंध कठोर करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद झाली. बाजारपेठ ओस पडली. टप्प्याटप्प्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील काही दुकानांना मुभा मिळाली. मात्र, अन्य दुकाने बंद होती. आता कोरोनाचा आलेख खाली आला. यामुळे २ जूनपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली.
दीड महिन्यापासून ओस पडलेली बाजारपेठ बुधवारी पहिल्याच दिवशी गर्दीने फुलून गेली. कापड लाइन, आजाद चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, शिवाजी चौक स्थित बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आत्तापर्यंत निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत येणे टाळत होते. निर्बंध शिथिल झाल्याने पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्लॅस्टिक कापड, ताडपत्री यांसह शेतीविषयक वस्तू, साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ गाठली.
बॉक्स
भाजीपाला खरेदीसाठीही गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, तीन पुतळ्याजवळ, बस स्टँड परिसर, पालिकेसमोर गर्दी झाली. या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव तर वाढणार नाही ना, याची दक्षता कुणाकडूनच घेतली गेली नाही. व्यापारी व कर्मचाऱ्यांनी रॅपिड टेस्ट करून घ्याव्यात. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.