जिल्ह्यात बाजारपेठेवर प्रतिबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 05:00 AM2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:12+5:30
विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी रविवारी दुपारी प्रतिबंधित उपाययोजनांचे आदेश जारी केले. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व उद्योग सुरू ठेवता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये व आस्थापना वगळता इतर कार्यालयांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के किंवा १५ व्यक्तींनाच कामावर येता येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने बाजारपेठेवर पुन्हा प्रतिबंध लावण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. तर, ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले, अशा प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी ८ ते दुपारी ३ पर्यंत दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी रविवारी दुपारी प्रतिबंधित उपाययोजनांचे आदेश जारी केले. यामध्ये नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रात असलेले सर्व उद्योग सुरू ठेवता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील शासकीय कार्यालये व आस्थापना वगळता इतर कार्यालयांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के किंवा १५ व्यक्तींनाच कामावर येता येणार आहे. ग्राहकांनाही खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदाराकडे जावे, दूरचा प्रवास टाळावा, असे निर्देश आहे. उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता तेथून पार्सल सुविधा देण्यास परवानगी आहे. सर्व शैक्षणिक कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक यांना कामाकरिता परवानगी आहे. मालाच्या वाहतुकीवरही कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही. आंतरजिल्हा वाहतूक पूर्ववत आहे. एसटी बसमधून क्षमतेच्या ५० टक्के प्रवासी सोशल डिस्टन्सिंग राखून नेता येणार आहे. धार्मिक स्थळावर एकावेळी दहापेक्षा जास्त नागरिकांना जाण्याची मुभा नाही. ठोक भाजीबाजार हा पहाटे ३ ते सकाळी ६ या कालावधीत सुरू राहील. त्या ठिकाणी किरकोळ भाजी विक्रेत्यांनाच प्रवेश आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी वर्ग बंद राहणार आहे. सिनेमागृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे ही ठिकाणे बंद आहे.
लग्नाला केवळ २५ व्यक्तींनाच परवानगी
लग्न सोहळ्याला वधू-वरासह केवळ २५ व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे. याची रीतसर तहसीलदारांकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. खासगी वाहनातून चालकासह चौघांना, दुचाकीवर दोघांना हेल्मेट, मास्क वापरून प्रवास करता येणार आहे.
कळंबचा तरुण दगावला, जिल्ह्यात ७५ नवे रुग्ण
रविवारी जिल्ह्यात एका तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. तर दिवसभरात तब्बल ७५ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आले. रविवारी दगावलेला ४० वर्षीय पुरुष हा कळंब तालुक्यातील रहिवासी होता. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार, पॉझिटिव्ह आलेल्या ७५ जणांमध्ये ४६ पुरुष आणि २९ महिला आहेत. यात यवतमाळातील ४० रुग्ण, पुसद येथील ९, दिग्रस ८, पांढरकवडा ८, दारव्हा २, बाभूळगाव २, घाटंजी २, आर्णी १, कळंब १, महागाव १ आणि उमरखेड़ येथील १ रुग्ण आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९५० ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तर ४४७ जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.