लग्नं रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 05:04 PM2017-07-19T17:04:25+5:302017-07-19T17:18:48+5:30
शेतीला पाणी नाही,उत्पादनाला भाव नाही,शेतमालाला बाजारपेठ नाही..आता तरशेती करणाऱ्या तरुणाच्यावयाची तिशी उलटली तरीलग्नाला मुलगी मिळत नाही.
- हिनाकौसर खान-पिंजार
शेतीला पाणी नाही,
उत्पादनाला भाव नाही,
शेतमालाला बाजारपेठ नाही..
आता तर
शेती करणाऱ्या तरुणाच्या
वयाची तिशी उलटली तरी
लग्नाला मुलगी मिळत नाही.
‘मागच्या सात वर्षांपासून मोठा मुलगा शेती करतोय. घरची स्थिती बरी आहे. लहान मुलगा इंजिनिअर झालाय. थोरल्यासाठी तीन वर्षांपासून मुलगी शोधतोय पण शेती करतो म्हटल्यावर स्थळं येणंच बंद झालीत. लहान मुलाला मात्र नोकरी लागल्याबरोबर स्थळ चालून आलं. आता थोरल्याच्या लग्नाची फार काळजी लागलीय. शेतकऱ्यांच्या मुलीसुद्धा नको म्हणत्यात.’
- एक वैतागलेले बाबा सांगत होते.
**
‘आजतोवर शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला हमीभाव नव्हता. आता शेतकऱ्यांच्या शेतीच करणाऱ्या पोरांनाही बायको मिळण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. मुलाची नोकरी साधी असल तरी चालल पण शेतकरी नको. अगदी दहा एकर जागा, मुलगा एकुलता एक असेल तरीही मुली आणि त्यांचे आईबाप ‘शेतकरी मुलगा’ म्हटलं की पुढं काही बोलतच नाहीत. आमचा पुतण्या गेली पाच वर्षं झाली मुलगी शोधतोय. आता तर तो लग्नाचं नाव काढलं तरी वैतागतो. - एक काका उदास होत सांगत होते.
**
‘आज खेड्यात जमीन असण्यापेक्षा तालुक्याला १० बाय १० चं दुकान असलं तरी लवकर लग्न होतं पोरांचं. मी पण शेतकरीच. मात्र पोरीला कधी काही कमी पडू दिलं नाही. लाडात वाढली ती. मग तिचं लग्न लावून देताना हयगय कशी करणार? मुलाचं गाव जर दुष्काळी पट्ट्यात असेल, घरी गायगुरं असतील आणि पाणी भरायला हंडे घेऊन लांब कोसावर जावं लागत असेल तर पोरीला कसं द्यायचं त्या गावी?’
- पोरीचा शेतकरी बापही आपली सल सांगतो.
**
ही सारी माणसं काय सांगताहेत? ते सांगताहेत शेतीचा प्रश्न आता जगण्यात कसे वेगवेगळे पेच निर्माण करतोय. त्यातलाच एक म्हणजे शेतकरी नवरा नको म्हणण्याची मुलींची मानसिकता. खेड्यातल्या मुलींनाही शहरी, नोकरीवालाच मुलगा हवा अशी चर्चा आपण नेहमीच ऐकतो. शेतीच करतो मुलगा असं सांगितलं तर सर्वार्थानं अनुरूप मुलाशीही लग्न करायला मुली तयार होत नाहीत. शिकलेल्या मुली तर लग्न करून खेड्यापाड्यात यायलाच तयार नाहीत असं चित्र आहे. त्यावरून मुलींवर टीका, शिक्षणाचे परिणाम असे शेरेही सर्रास मारले जातात. मात्र फक्त याच कारणांमुळे शेती करणाऱ्या मुलांची लग्नं होत नाहीत, की त्यांची लग्नं न जुळण्याची अन्यही काही कारणं आहेत?
आणि शोधलंच तर याशिवाय अन्य कारणं, शेती करणाऱ्या उपवर मुलांचे प्रश्न नेमके काय दिसतात?
आणि ती कारणं सांगतात की, शेतकरी मुलाला तो शेतीच करतो म्हणून नकार मिळण्यापेक्षा शेतीतली असुरक्षितता, शेतीत न मिळणारी उत्पन्नाची हमी यामुळेही उपवर शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. कारण शेतीतली असुरक्षितता लग्न करताना मुलींना घाबरवून सोडते. या साऱ्या कारणांची पुष्टी केली आहे ती अलीकडेच ४५ गावांत करण्यात आलेल्या एका अभ्यासातून!