शहीद पोलीस आग्रमन रहाटे अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 10:13 PM2019-05-03T22:13:20+5:302019-05-03T22:14:05+5:30
शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ गावापर्यंतचा रस्ता गर्दीने व्यापून गेला होता.
आसीफ शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा (आर्णी) : शहीद आग्रमन अमर रहे, भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शुक्रवारी शहीद आग्रमन बक्षी रहाटे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी तिरंग्यात लपेटलेल्या आग्रमन यांच्या अंत्ययात्रेने तरोडा गावापासून मंगरुळ गावापर्यंतचा रस्ता गर्दीने व्यापून गेला होता.
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा येथे महाराष्ट्र दिनी झालेल्या नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले. त्यात तरोडा (ता. आर्णी) येथील आग्रमन बक्षी रहाटे यांनाही वीरमरण आले. गुरुवारी रात्री १२ वाजता त्यांचे पार्थिव तरोडा येथे आणण्यात आले. तत्पूर्वीच गावातील तसेच पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी तरोडा येथे गर्दी केली होती. तसेच आर्णीचे पोलीस प्रशासनही उपस्थित होते. तर शुक्रवारी सकाळी ८ वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. तरोडा येथील प्राथमिक शाळेपासून सुरू झालेली ही अंत्ययात्रा नागपूर-तुळजापूर महामार्गावरून मंगरुळ येथे गेली. तेथून पुन्हा तरोडा गावात अंत्ययात्रा पोहोचली. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांनी शहीद आग्रमन अमर रहे, शहीद आग्रमन जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.
आग्रमन यांची आई निर्मलाबाई, पत्नी रेश्मा, गार्गी व आरुषी या दोन मुली, सुकेशना व रिना या बहिणी तसेच भाऊ आशिष यासर्वांचे दु:ख पाहून उपस्थित जनसागरही हेलावून गेला. अंत्ययात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी गावकऱ्यांनी, चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारासाठी तरोडा ग्रामवासीयांनी प्राथमिक शाळेच्या पटांगणात शहीद स्मारक तयार केले. त्या स्मारकामध्ये भाऊ आशिष रहाटे यांनी शहीद आग्रमन यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार संदीप धुर्वे, विजय मोघे, जितेंद्र मोघे, अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, आर्णीचे तहसीलदार श्रीकांत निळे, ठाणेदार यशवंत बावीस्कर, सरपंच भेडेकर, पंचायत समितीचे माजी सभापती राजू वीरखेडे, गुरुदेव सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गणेशराव मोरे यासह हजारो नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. पोलीस प्रशासनातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.
शहीद आग्रमन अमर रहे !
संपूर्ण जिल्ह्यातून हजारो नागरिक शहीद आग्रमन रहाटे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. लांबच लांब निघालेल्या अंत्ययात्रेत नागरिकांनी शहीद आग्रमन अमर रहे, शहीद आग्रमन जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.