मारवाडी, पन्हाळा, सेलू रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:42 AM2021-04-09T04:42:06+5:302021-04-09T04:42:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : पुसद ते वाशीम या मार्गावरील सेलू बु. ते मारवाडी या रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पुसद ते वाशीम या मार्गावरील सेलू बु. ते मारवाडी या रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे. त्यासाठी दोन्ही बाजूचा रस्ता उखडून ठेवल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वच वाहनांना त्रास होत आहे.
या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे धुळीच्या कणांमुळे प्रचंड हाल होत आहेत. संबंधित कंत्राटदार शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन करत नाही. या मार्गाचे बांधकाम करताना प्रथम एका बाजूचे बांधकाम करून नंतर दुसऱ्या बाजूने खाेदकाम करणे गरजेचे होते. मात्र, कंत्राटदाराने एकाचवेळी दोन्ही बाजूचा रस्ता खोदला. वास्तविक एका बाजूने जाणाऱ्या रस्त्याने माती, खडक टाकून कच्चा रस्ता पाणी टाकून तयार करून नागरिकांना ये-जा करण्यासाठी खुला करावयाचा असतो. परंतु, तसे न करता कंत्राटदाराने सरसकट दोन्ही बाजूचा रस्ता खोदून ठेवला आहे.
आता या रस्त्यावरील माती, लहान दगड वर आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. या रस्त्यावरून जाताना अनेक नागरिक दुचाकीवरून घसरून पडले. वेळीच या रस्त्याची सुधारणा न केल्यास अनेक वाहनधारकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे कंत्राटदाराने पर्यायी रस्त्याची व्यवस्था न केल्यास नागरिक कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.