अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचार; तीन नराधमांना २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 03:54 PM2019-08-23T15:54:33+5:302019-08-23T15:55:08+5:30
या घटनेतील पीडित मुलगी ही शिक्षणाच्या निमित्ताने यवतमाळात राहत होती
यवतमाळ : एका मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ टी.एस. अकाली यांनी शुक्रवारी प्रत्येकी २० वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
आकाश सुभाष नारायणे (२३), विवेक उर्फ विक्की भगवान वागदे (२३) व फिरोज ज्ञानेश्वर मोटघरे (२७) सर्व रा. पारवा ता. यवतमाळ अशी या शिक्षा झालेल्यांची नावे आहे. शिक्षेचा निर्णय ऐकताच आरोपींच्या नातेवाईकांनी न्यायालयात एकच गोंधळ घातला. या घटनेतील पीडित मुलगी ही शिक्षणाच्या निमित्ताने यवतमाळात राहत होती. २० एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजता विवेकने सदर मुलीला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून गोधनी रोडवर बोलविले तेथून तिला मोटरसायकलने पारवा गावाकडे नेले. तत्पूर्वी वाटेत आकाश त्यांना भेटला. तोसुद्धा मोटरसायकलवर बसला. त्यानंतर पारवा शिवारात तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आले. त्या नंतर पारवातील शाळेत तिला नेण्यात आले. तेथे विवेकचा मित्र फिरोज मोटघरे हा सुद्धा आला. त्यानेही तिच्यावर अत्याचार केले. या सामूहिक अत्याचारामुळे सदर मुलीची मानसिकता खालावली. दुसऱ्या दिवशी तिने यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अपहरण व सामूहिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला गेला. सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
सामूहिक अत्याचाराचा हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ टी.एस. अकाली यांच्यापुढे चालला. न्यायालयाने एकूण पाच साक्षीदार तपासले. मुलीचे बयान, तपास अधिकारी व इतरांची साक्ष तसेच परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरण्यात आले. न्यायालयाने आकाश व विवेक यांना अपहरणाच्या प्रकरणात सात वर्ष सश्रम कारावास, पाच हजार दंड तसेच या तीनही आरोपींना सामूहिक अत्याचाराच्या गुन्ह्यात २० वर्ष सश्रम कारावास व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला देण्याचे तसेच जिल्हा विधीसेवा प्राधिकरणानेसुद्धा या मुलीला नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात सरकारच्यावतीने सहायक सरकारी अभियोक्ता अॅड. विजय तेलंग यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी दिनकर चौधरी यांनी सहकार्य केले. आरोपींची बाजू अॅड. इम्रान देशमुख यांनी मांडली.