भूमाफियांच्या फरारीतच ‘मास्टर मार्इंड’ इन्टरेस्टेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 09:59 PM2018-08-11T21:59:21+5:302018-08-11T21:59:44+5:30

कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत.

'Master-bound' inter-shared only during the absence of landlady | भूमाफियांच्या फरारीतच ‘मास्टर मार्इंड’ इन्टरेस्टेड

भूमाफियांच्या फरारीतच ‘मास्टर मार्इंड’ इन्टरेस्टेड

Next
ठळक मुद्देअटक होऊ नये म्हणून धडपड : नावे रेकॉर्डवर येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोट्यवधींच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश यादव फरार असून तो अटक झाल्यास या घोटाळ्यातील अद्याप पडद्यामागे असलेले तमाम मास्टर मार्इंड रेकॉर्डवर येणार आहेत. या भीतीतूनच मास्टर मार्इंडची राकेशवर नजर असून तो कोणत्याही परिस्थितीत अटक होऊ नये असाच त्यांचा प्रयत्न आहे. सुदैवाने त्यांच्या या प्रयत्नांना ‘एसआयटी’चीही भरभरुन साथ मिळते आहे, हे विशेष.
भूखंड घोटाळ्यात सात गुन्हे दाखल झाले. त्यात राकेश यादव व मंगेश पन्हाळकर हे आरोपी आहेत. त्यातही भूखंड घोटाळ्याची सर्वाधिक गुंतागुंत ही राकेशसोबत जुळली आहेत. एकदा राकेश पोलिसांच्या ताब्यात आल्यास या घोटाळ्यातील सर्व संबंधितांची नावे पोलिसांनी ‘प्रामाणिकपणे’ तपास केल्यास रेकॉर्डवर येऊ शकतात. हीच भीती या घोटाळ्यातील मास्टर मार्इंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अवैध सावकार, बोगस मालकीवर कोट्यवधींचे कर्ज मंजूर करणारे बँकांचे अधिकारी-पदाधिकारी, क्रिकेट सट्टा-जुगार क्लब चालविणारे सटोडिये आणि त्या सर्वांना ‘भागीदारी’च्या माध्यमातून घरातूनच राजकीय आशीर्वाद उपलब्ध करून देणारी ‘प्रतिष्ठीत’ मंडळी आदींना आहे. त्यामुळेच काहीही झाले तरी राकेश पोलिसांच्या हाती लागू नये, असाच त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आहे.
म्हणे, राकेशच्या फरारीतच भलाई
तो फरार राहण्यातच या मास्टर मार्इंडची भलाई असल्याने त्याला यवतमाळपासून दूर, वेळ प्रसंगी राज्याबाहेर कदाचित मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशात त्याला आश्रयाला ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राकेशला अनेक वर्ष फरारच ठेऊन प्रकरण शांत ठेवण्याची मास्टर मार्इंडची व्युहरचना आहे.
बँक एजंट करतोय सावकारी!
बोगस मालकीचे भूखंड तारण ठेऊन त्यावर बँकांनी केलेल्या कर्ज मंजुरीतील अनेक बारकावेही पुढे येत आहे. तीन कोटींच्या एका प्रकरणात बँकेच्या रेकॉर्डवर एजंट असलेला राहूल प्रत्यक्षात लाखो रुपयांची सावकारी करीत असून व्यापाऱ्यांना पैसा पुरवितो. या कर्जाची परतफेड एजंटाकडील खात्यातून केली गेली. त्याचे पैसेही विशिष्ट व्यक्तीकडून भरले जात होते. मशीनमधील डेटा तपासल्यास पोलिसांना मास्टर मार्इंडपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.
‘बाजीराव’ केव्हा बरसणार?
पोलिसांचा ‘बाजीराव’ बँक अधिकाऱ्यांचे तोंड सहज उघडू शकतो. केवळ त्यासाठी पोलिसांचे ‘प्राामणिक’ प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती व कर्तव्यदक्षतेची तेवढी गरज आहे. आतापर्यंतच्या ‘एसआयटी’च्या तपासात तरी याबाबी दिसून आल्या नाही. किमान या पुढील तपासात तरी त्या दिसतील, अशी अपेक्षा यवतमाळकर नागरिक ठेऊन आहेत. बँकांनी फसवणूक होऊनही अद्याप पोलिसात न दिलेल्या तक्रारी यातच बँकांची यंत्रणा बोगस कर्ज प्रकरणात आकंठ बुडाल्याचे सिद्ध करीत आहे.
आदिवासींची शंभर एकर जमीन घशात, धामणगाव रोडवर अधिक
भूमाफियांचे मास्टर मार्इंड असलेले व समाजात प्रतिष्ठीत म्हणून वावरणाऱ्यांनी भागीदारीत यवतमाळ शहराच्या चहूबाजूने आदिवासींची शंभर एकरापेक्षा अधिक जमीन ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आपल्या मर्जीतील आदिवासींच्याच नावावर ही जमीन खरेदी केली गेली. महाराज, तरुण असे काही या जमिनीत भागीदार आहेत. धामणगाव रोडवरील घाटाच्या डाव्या बाजूला यातील काही जमीन आहे. समोर वनजमीन व मागे आदिवासींची जमीन आहे. ती २५ ते ३० लाख रुपये एकराचा भाव असताना अवघ्या चार ते पाच लाखात हडपली गेली आहे. त्यासाठी भाईगिरीची दहशतही निर्माण केली गेली.
बँक अधिकाऱ्यांना बोलते करा ना...
या कर्ज प्रकरणात बँकांच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी बोलते केल्यास कर्जासाठी नेमका कुणी दबाव टाकला, हे उघड होण्यास वेळ लागणार नाही. या कर्ज प्रकरणाने कुणाला नोकरी सोडावी लागली तर कुणाला तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. या कर्ज प्रकरणाचे काही पुरावे रवीकडे असल्याचे सांगितले जाते.

Web Title: 'Master-bound' inter-shared only during the absence of landlady

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.