मास्टरमाईंड परस्पर करतोय जिल्हा बँक खातेदारांना फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 05:00 AM2021-03-18T05:00:00+5:302021-03-18T05:00:01+5:30

आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाने महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित केले आहे. यातीलच एक या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड ओळखला जातो. बँकेच्या तिजोरीतील लाखो रुपयांची रोकड व्यापाऱ्यांना दोन टक्के व्याज दराने देणे, खातेदारांच्या अकाऊंटमधून परस्पर लाखो रुपयांची रक्कम काढून घेणे असे प्रकार घडले आहेत. एवढा मोठा कारनामा करूनही त्याच्या विरोधात पोलिसात अद्याप तक्रार दाखल न झाल्याने तो मोकळाच आहे.

Mastermind interacts with District Bank account holders | मास्टरमाईंड परस्पर करतोय जिल्हा बँक खातेदारांना फोन

मास्टरमाईंड परस्पर करतोय जिल्हा बँक खातेदारांना फोन

Next
ठळक मुद्देआर्णी शाखेतील गैरव्यवहार : अद्याप हातकड्या न लागल्याचा उठवितोय फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड अद्याप हातकड्या न लागल्याने मोकळाच आहे. त्यामुळे त्याने स्वत:च खातेदारांना परस्पर फोन करून ‘बँकेत जाऊ नका, तक्रार देऊ नका, मी बाहेरच तुमच्या गेेलेल्या पैशाची व्यवस्था करून देतो’ अशी गळ घालणे सुरू केले आहे. 
आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाने महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित केले आहे. यातीलच एक या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड ओळखला जातो. बँकेच्या तिजोरीतील लाखो रुपयांची रोकड व्यापाऱ्यांना दोन टक्के व्याज दराने देणे, खातेदारांच्या अकाऊंटमधून परस्पर लाखो रुपयांची रक्कम काढून घेणे असे प्रकार घडले आहेत. एवढा मोठा कारनामा करूनही त्याच्या विरोधात पोलिसात अद्याप तक्रार दाखल न झाल्याने तो मोकळाच आहे. त्यामुळे त्याने बँकेत खातेदारांनी जाऊ नये यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातूनच काहींना त्याने संपर्क केला व तक्रार करू नका, मी तुमचे पैसे देतो, असे सांगितले. मात्र खातेदार त्याची ही विनवणी धुडकावून थेट बँकेत खात्यातील रक्कम तपासणीसाठी जात आहेत व रक्कम कमी आढळल्यास व्यवस्थापकाकडे रीतसर तक्रार नोंदवित आहेत. मास्टरमाईंड स्वत:हून फोन करीत असल्याने आर्णी शाखेत नेमक्या कुणाकुणाच्या खात्यातून किती रक्कम गहाळ केली, याची इत्थंभूत माहिती त्याला असावी असे स्पष्ट होते. त्या आधारेच तो संबंधित खातेदारांना संपर्क करीत आहे. या प्रकरणात प्रत्यक्ष एफआयआर होण्यास आणखी किती वेळ लागतो याकडे लक्ष आहे. पैसे भरून मिळतील या आशेपोटी खातेदार अद्याप पोलीस ठाण्याची पायरी चढलेले नाहीत. एवढा घोटाळा करूनही मास्टरमाईंड मोकळा कसा, याची चर्चाही होताना दिसते. 
आर्णी शाखेतील या घोटाळ्याची व्याप्ती बरीच मोठी  आहे.  पण आकडा कमी दाखविण्याचा प्रयत्न तर होणार नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत   आहे. त्रयस्थ सीएच्या लेखापरीक्षणात गैरव्यवहाराचा नेमका आकडा व फटका बसलेल्या खातेदारांची संख्या, नावे उघड होणे अपेक्षित आहे. मात्र या गैरव्यवहाराचे लाभार्थी केवळ बँकेतच की बँकेच्या बाहेरही याबाबत तर्क लावले जात आहेत. निलंबितांपैकी गैरव्यवहारात कुणाचा नेमका दोष किती हे यथावकाश स्पष्ट होईलच. मात्र या गैरव्यवहाराचे ‘वाटेकरी’ जुन्या संचालकांपैकी तर कुणी नाही ना, अशी शंकाही खातेदारांमधून व्यक्त होत आहे. एवढा मोठा गैरव्यवहार करणाऱ्या या मास्टरमाईंडला संचालक मंडळातील नेमके कुणाचे पाठबळ असावे, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहे. 
दरम्यान, गैरव्यवहार उघडकीस आल्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी बँकेत रकमेची तपासणी करणाऱ्यांची गर्दी आणखी वाढली. बँकेचे एक संचालक राजूदास जाधव यांनी दुपारी बँकेला भेट दिली. तर एक लाखांचा धनादेश दिला असताना खात्यातून सात लाख रुपये काढले गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षकाने थेट बँकेच्या अध्यक्षांना फोन करून आर्णी शाखेत भेट देण्याची विनंती केली. 

  वृद्धेच्या खात्यातील ३५ हजार उडविले 
आर्णीतील ग्रीन पार्क येथे राहणाऱ्या अनुसया शंकर वानखेडे (३५) या वृद्धेने २ जुलै २०१९ ला आर्णी शाखेत ५० हजार रुपये जमा केले. त्यापैकी एकदा पाच हजार व एकदा दहा हजार त्यांनी काढले. मात्र त्यानंतर त्यांच्या खात्यातील ३५ हजार रुपये परस्परच गहाळ झाले. सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एका माजी संचालकाची भेट घेऊन याची माहिती दिली. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही तर बँकेच्या कर्मचाऱ्यांनीही उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे अनुसया यांनी बुधवारी ‘लोकमत’ला सांगितले. गंभीर प्रकार उघड होऊनही दखल न घेणाऱ्या त्या माजी संचालकाचा ‘इन्टरेस्ट’ काय, असा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होत आहे. 
 

गहाळ रक्कम पोहोचली एक कोटी सात लाखांवर
 बुधवारी सायंकाळपर्यंत एकूण ५२ खातेदारांनी आपल्या खात्यातून परस्पर रक्कम गहाळ झाल्याच्या तक्रारी नोंदविल्या. ही रक्कम एक कोटी सात लाख रुपये एवढी असल्याचे सांगण्यात आले. 
तपासणी व दक्षता पथक नेमके करते तरी काय ?
अकस्मात भेटी देऊन तपासणी करणे, व्यवहारांवर वाॅच ठेवणे यासाठी जिल्हा बॅंकेत उपसरव्यवस्थापकांच्या नेतृत्वात तपासणी आणि दक्षता ही दोन स्वतंत्र पथके आहेत. ही पथके कार्यरत असताना आर्णी शाखेत एवढा मोठा आर्थिक घोळ कसा असा मुद्दा उपस्थित होत आहे. या गैरव्यवहाराने तपासणी व दक्षता पथकातील   अधिनस्त यंत्रणेच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. या पथकांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

दोन आठवड्यांपूर्वीच घेतली खासदारांची भेट 
आर्णी शाखेतील गैरव्यवहाराची जिल्हा बँकेच्या यवतमाळ मुख्यालयाला कुणकूण लागल्यानंतर संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीने तीन निलंबितांपैकी दोघांनी दोन आठवड्यांपूर्वी आर्णीच्या शासकीय विश्रामगृहावर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार सुरेश धानोरकर यांची भेट घेतली. आर्णीतील काँग्रेसच्या  दोन पदाधिकाऱ्यांनी या भेटीसाठी मध्यस्थी केली. मात्र   झालेली निलंबन कारवाई बघता त्यांची भेट व्यर्थ ठरल्याचे दिसते. मध्यस्थाची भूमिका वठविणाऱ्यांची या गैरव्यवहारातील ‘मास्टरमाईंड’शी जवळीक तर नाही ना, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Mastermind interacts with District Bank account holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.